आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री हे पंढरपूरच्या विठोबाची मनोभावे पूजा करतात. यावेळी मुख्यमंत्री राज्यावरील संकटं दूर करण्यासाठी पांडुरंगाला साकडं घालतात. पण आजवर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गज राजकीय नेते आले आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे.
तसेच माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी देखील राष्ट्रपती असताना विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी त्यांनी एक अनोखा आग्रह धरला. याबाबत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे परंपरागत पुजारी ऍड. आशुतोष बडवे यांनी माहिती दिली आहे.
(हेही वाचा: नेहरू ठेचकाळले आणि पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या गाभा-याबाहेरील उंबराच काढून टाकला! काय झालं नेमकं?)
धरला स्नानाचा आग्रह
1992 ते 1997 या काळात शंकर दयाळ शर्मा हे देशाचे राष्ट्रपती होते. त्यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट दिली. चंद्रभागेच्या किनारी वसलेल्या या मंदिरामुळे आणि आसपासच्या परिसरामुळे ते मोहित झाले आणि त्यांनी चंद्रभागेच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याचा आग्रह धरला. पण राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शंकर दयाळ शर्मा यांना स्नानासाठी परवानगी देणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने परवानगी नाकारण्यात आली, पण तरीही ते आपल्या आग्रहावर ठाम होते.
असा निघाला मार्ग
विनंती करूनही शंकर दयाळ शर्मा काही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा मग मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांना एक पर्याय सुचवण्यात आला. चंद्रभागा नदीवर राष्ट्पतींच्या स्नानासाठी बंदोबस्त लावणे कठीण असल्याने चंद्रभागेच्या पाण्याने भरलेल्या घागरी आपल्याला आणून देतो आणि मग आपण स्नान करा, अशी विनंती शर्मा यांना करण्यात आली. अखेर ही विनंती त्यांनी मान्य केली आणि त्यानुसार स्नान केले. त्यावेळी सुरक्षा यंत्रणांच्या मदतीला एकप्रकारे पांडुरंगच धावून आला.
(हेही वाचा: समाजवाद्यांनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेला विरोध केला आणि मग जे झालं त्याने…)
Join Our WhatsApp Community