राणेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ वक्तव्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकऱणी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नारायण राणेंना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण देण्यात येणार आहे. याप्रकरणी धुळे येथे राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर राणेंनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. कोकणातील भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये माध्यमांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्याविरोधात महाड, नाशिक, औरंगाबाद, पुणेसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, जामीन मंजूर करताना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावावी, अशी अट न्यायालयाने घातली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अंतरिम दिलासा उच्च न्यायालयाने दिला असून दोन आठवडे कोणतेही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)

मुख्यमंत्र्यांबाबत राणेंचं आक्षेपार्ह वक्तव्य

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. आज ७४ वर्ष पूर्ण करून ७५ व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी…. अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करत आहोत. असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरून नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लागवली असती, अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here