मुंबई पोलीस ठाण्यातील ऑर्डली, मिल्स स्पेशल आणि इंचार्ज अंमलदार यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्या करण्यामागे नक्की काय कारण असू शकते, हे स्पष्ट झालेले नसले, तरी सर्वांना त्या पदावर राहण्याची संधी मिळावी म्हणून हा बदल करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी ऑर्डली हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडामोडीमधील दुवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
( हेही वाचा : ज्ञानव्यापी मंदिराप्रमाणे मुस्लिम आक्रमणाची पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरालाही बसलेली झळ, पण… )
मुंबईतील पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार यांच्यात ऑर्डरली, मिल्स स्पेशल आणि इंचार्ज अंमलदार ही महत्वाची पदे मानली जातात. हे तिघेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मर्जीतील व्यक्ती असतात, त्यामुळे या पदाला पोलीस ठाण्यात अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या तीन पदांवर काम करणारे अंमलदार हे बदली होत नाही तोपर्यंत या पदावर राहतात, त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर अंमलदारांना त्या पदावर राहण्याची संधी मिळत नाही. पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षक याला पोलीस ठाण्यातील घडामोडी, गुन्ह्यांची माहिती, हद्दीतील ठिकाणे व इतर आर्थिक सोर्स हा या पदावर वर्षानुवर्षे रहाणाऱ्या अंमलदाराकडून मिळते. त्यामुळे त्यांची बदली न होता त्यांना कायम त्या पदावर ठेवले जाते.
मात्र एका प्रकरणावरून पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याला एक पत्रक काढून ऑर्डरली, मिल्स स्पेशल आणि इंचार्ज अंमलदार यांची माहिती मागितली आहे. या पदावर असणाऱ्या पोलीस अंमलदारांना या पदावर किती वर्षे झाली, याबाबत माहिती मागितली आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ या पदावर राहणारा अंमलदार यांना तात्काळ बदली करून इतरांना या पदावर संधी देण्यात यावी, असे म्हटले आहे. पोलीस आयुक्त यांच्या या पत्रकानंतर मुंबईतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ या पदावरील अंमलदार यांची बदली करण्यात आली आहे.
नेमके कारण काय?
मागील अनेक वर्षे या पदावर असणाऱ्या पोलीस अंमलदारांना त्यांची दुसऱ्या जागी बदली होत नाही, तोपर्यंत हटवले गेले नाही. त्यामुळे या पदावर असणारे अंमलदार यांचा रुबाब अधिकारी वर्गापेक्षा जास्त वाढला आहे. मुंबईतील एका पोलीस ठाण्यात बसलेल्या ठाणे अंमलदार यांनी बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील ऑर्डरलीने तुम्ही कुणाला विचारून गुन्हा दाखल केला, असे बोलून त्या ठाणे अंमलदाराला झापले, त्यामुळे दुखावलेल्या ठाणे अंमलदार यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे सोशल मीडियावर तक्रार केली, त्यानंतर हे बदलीचे सत्र सुरू झाले असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काय आहे ही तीन पदे?
ऑर्डरली
हे पद पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा मदतनीस म्हणून केले गेले, या पदावरील अंमलदार यांना दररोजच्या गुन्ह्याची माहिती ठेवून त्याचे वेगळे रजिस्टर तयार करणे, पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, इतर घडामोडी संदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देणे, त्याच बरोबर गुन्ह्याचे सर्व कागदपत्रे तयार करणे या कामासाठी ऑर्डरली हे पद महत्वाचे मानले जाते. थोडक्यात ऑर्डरली हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्यात होणाऱ्या घडामोडीतील मधला दुवा मानले जातात.
मिल्स स्पेशल
हे पद देखील तेवढेच महत्वाचे असून मिल्स स्पेशल हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कान-डोळे आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकीय घडामोडी, आंदोलने, मोर्चे,धरणे यांची माहिती गोळा करुन ती वरिष्ठ निरीक्षक यांना कळवतो. मिल्स स्पेशलला हद्दीतील राजकारणी,कार्यकर्ते यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात, त्याच बरोबर हद्दीत होणाऱ्या राजकीय घडामोडी, राजकीय पक्ष, मंडळे, सामजिक संस्था यांच्यात घडामोडी वरिष्ठ पर्यत पोचवणे हे मिल्स स्पेशल यांचे काम असते.
इंचार्ज अंमलदार
इंचार्ज अंमलदार हा सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार या पदावरील व्यक्ती इंचार्ज अंमलदार या पदावर राहते. पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायापासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (जमादार) यांना कुणाला कुठे ड्युटी देणे पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ माहिती ठेवणे हे इंचार्जचे कामे असतात.