आयुष्यात हसणे आणि हसवणे खूपच महत्वाचे आहे. दादा कोंडके म्हणायचे, ’कुणी निंदा कुणी वंदा, आमचा हसवण्याचा धंदा.’ तर मित्रांनो, चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनवण्यासाठी दरवर्षी २० मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ (International Day Of Happiness) साजरा केला जातो. जीवनातील आनंदाचे महत्त्व पटवून देणे हा या दिनाचा उद्देश आहे. खरंतर देश किंवा अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी केवळ जीडीपीच नाही तर आनंदाचीही गरज असते.
युनायटेड नेशन्स दरवर्षी २० मार्च रोजी जगभरातील आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे (International Day Of Happiness) आयोजन करते. हा खास दिवस आपल्याला आठवण करून देतो की आनंदी राहणे हा मानवी हक्क आहे. हा दिवस तुम्हाला आनंदी राहण्याची आणि साजरा करण्याची सुवर्ण संधी देतो. आनंदाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा दिवस २०१३ पासून दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिवस २० मार्च २०१३ रोजी साजरा करण्यात आला.
१२ जुलै २०१२ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने जगभरातील लोकांच्या जीवनात आनंद आणि कल्याण हे एक महत्त्वाचे ध्येय बनवण्यासाठी आणि जीवनातील आनंदाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी २० मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला. इंटरनॅशनल हॅपीनेस डे (International Day Of Happiness) साठी बैठक आयोजित करण्यासाठी भूतानने सर्वप्रथम पुढाकार घेतला होता. या देशाने १९७० च्या सुरुवातीपासून ‘राष्ट्रीय महसूल’ पेक्षा ‘राष्ट्रीय आनंदाला’ अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे आनंद दिन सर्वात आधी भुतानने साजरा केला असे म्हणायला हवे.
Join Our WhatsApp Community