प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर हा देव असतो. परंतु रुग्णांची देखभाल करण्यात परिचारिकांचे (Nurse) मोठे योगदान असते. १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाईटॅंगल या जगातील पहिल्या परिचारिका म्हणून ओळखल्या जातात. कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टरांसह परिचारिकांनी काम केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोरोनाच्या काळात लढाई लढणाऱ्या, प्रसंगी कसोटीच्या क्षणांना सामोरे गेलेल्या परिचारिकांचे अनुभव त्यांच्या शब्दात….
रूग्ण हेच आमचे दैवत
1998 ला शिक्षण पूर्ण करत मी नर्सिंग क्षेत्रात आले. 2001 ला मी शासकीय सेवेत रूजू झाले. परंतु कोरोनासारखी स्थिती मी याआधी पाहिली नव्हती. कोरोनाची लाट आल्यावर सुरूवातीला प्रत्येकजण घाबरला होता. मनुष्य स्वभावानुसार आम्हीही सुरूवातीला घाबरलो होतो. त्याकाळी प्रत्येकजण डॉक्टर, नर्सेसमध्ये देव पाहत होता. नर्सिंगमध्ये रूग्ण हेच आमचे दैवत आहे अशी आम्ही शपथ घेतो यानुसार आम्ही आमचे कर्तव्य बजावले. काही कालावधीनंतर रूग्णांना बेड मिळणे अशक्य होते तेव्हा जे.जे. रुग्णालयात सुद्धा पाच विशेष वॉर्ड तयार करण्यात आले. जे.जे. रूग्णालयात कोविड-नॉन कोविड अशा दोन्ही सेवा रूग्णांना देण्यात आल्या. मी या कोविड विशेष वॉर्डवर मी ड्युटी केली, मी स्वत: कोविड पॉझिटिव्ह आले होते. यावेळी कुटुंबाने सुद्धा संकटात लढण्याचे बळ दिले.
आरती कुंभारे – सिस्टर इंचार्ज जे.जे. रूग्णालय
रूग्ण बरा होण्याचे समाधान
सेंट जॉर्ज हॉस्पिटल पूर्णपणे कोविड रूग्णांसाठी समर्पित केल्यावर सगळ्यांच्या मनात भिती होती. परंतु आमच्या नर्सिंग प्रोफेशननुसार आम्ही न घाबरता परिस्थितीला सामोरे गेलो. तेव्हा पीपीई किट या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या. पीपीई किटमधून श्वास घेतानाही त्रास व्हायचा. मी व कुटुंबातील काही सदस्य दोन वेळा कोविड पॉझिटिव्ह आले. पण रुग्णसेवा हे आमचे प्रथम कर्तव्य असते. परंतु जेव्हा रूग्ण बरा होऊन घरी जातो तेव्हा रूग्ण ज्या सकारात्मक प्रतिक्रिया देतात तेव्हा वाटते खऱ्या अर्थाने मेहनतीचे चीज झाले. शैलजा- सेंट जॉर्ज रूग्णालय
दरम्यान आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले तसेच शुभेच्छा देत प्रशंसा केली. ट्वीटरद्वारे पंतप्रधान म्हणाले की, “आपल्या वसुंधरेला निरोगी ठेवण्यात परिचारिका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्यांचे समर्पण आणि करुणा अनुकरणीय आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व परिचारिका कर्मचाऱ्यांची प्रशंसा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ” असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
Join Our WhatsApp Community