- पूजा पोवार
संस्कृती आणि सौंदर्य यांची जपणूक करणारे वस्त्र म्हणजे साडी! जगभरातील महिलांना परिधान करता येणारा पारंपरिक पोषाख…विविधरंगी, भरतकाम वैशिष्ट्यपूर्ण नमुने, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनचा वापर करून साडी तयार केली जाते. इ. स. पू. २८०० पूर्व काळात हिंदू ग्रंथांमध्ये ‘साडी’चा उल्लेख आढळतो. २१ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय साडी दिन साजरा केला जातो. यानिमित्त आधुनिक काळातील साडीचे विविध प्रकार, महाराष्ट्राच्या ‘पैठणी’मध्ये झालेला बदल… या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ! (International Saree Day)
सुरुवात…
२१ डिसेंबर २०१७ पासून ‘आंतरराष्ट्रीय साडी दिवस’ साजरा केला जातो. भारतात स्त्रियांनी साडी नेसण्याची परंपरा जुनी आहे. पुरातन काळापासून आदिवासी समजातील कातकरी महिला ज्या पद्धतीची साडी नेसायच्या तिला ‘साडीचा पटकूर’ असे म्हटले जायचे. ब्राह्मण समाजातील लोकं नऊवारी ब्राह्मणी पद्धतीची साडी नेसायच्या, तेव्हापासूनच समाजात नऊवारी साडीची प्रथा सुरू झाली. त्यानंतर सहावारी साडी सगळीकडे प्रचलीत झाली. परदेशातही भारतीय ‘साडी’विषयी कुतूहल आहे. आता लग्न कार्यामध्ये ‘नऊवारी साडी’ कार्यक्रमात विशेषत्वाने नेसली जाते. त्यासोबत नाकात नथ, दंडाला बाजूबंद, गळ्यात हार…अशा पारंपरिक पोषाखामुळे सकारात्मकता वाढायला मदत होते. ‘साडी’ या पोषाखाविषयीचे महत्त्व जनमानसात पसरावे, त्याचे आकर्षण, प्रकार, फायदे याविषयी माहिती व्हावी, याकरिता हा दिवस साजरा केला जातो, अशी माहिती फॅशन डिझायनर तज्ज्ञ देतात.
साडीचा शोध
प्रत्येक राज्यात तयार होणारा दोऱ्याचा पोत वेगळा आहे. दोऱ्याच्या पोतानुसार साडीचे कापडही प्रत्येक राज्यात वेगवेगळे असते. त्यामुळे शतकानुशतके प्रत्येक राज्यात स्वतंत्र शैलीच्या साड्या महिला परिधान करतात. त्यानुसार, त्या पद्धतीची साडी तिथे तयार होते. भारतीय उपखंडात ५००० वर्षांपूर्वी साडीचा शोध लागला होता, अशी माहिती आढळते. हा पारंपरिक पोषाख जागतिक व्यासपीठावर आपल्या भारतीय संस्कृतिची परंपरा आणि मूल्ये यांचे संवर्धन करतो. काही ठिकाणी १९व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजघराण्यातील स्त्रिया पैठणी घालत असत. आजही खास प्रसंगी विवाह सोहळा, धार्मिक कार्यक्रम, सभा, समारंभ, सोहळे…याकरिता महिला साडी परिधान करतात.
पैठणी…
महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणून ‘पैठणी’ची ओळख आहे. पैठणमध्ये पैठणी तयार करणाऱ्या कारागिरांचे कला केंद्र आहे. पैठणी ही गर्भरेशमी असून तिचा पदर संपूर्ण जरीचा आणि काठ रुंद आणि ठसठशीत वेलबुट्टीचे असतात. पैठणीच्या संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखीच वेलबुट्टी दिसते, हे तिचे खास वैशिष्ट्य! समृद्ध राजेशाही थाट, रेशमी दोऱ्याने कापडावर गुंफलेल्या आकृत्या ही तिची ओळख आहे. सध्याच्या काळात पैठणी साडीमध्ये विविधता आली आहे. बनारसी पैठणी, येवला पैठणी, बालगंधर्व पैठणी, डॉलर पैठणी, लोटस पैठणी, पेशवाई पैठणी…अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आता पैठणी तयार केली जाते. महाराणी पैठणी मोर, कमळ या नक्षीकामासाठी ओळखली जाते. पेशवाई पैठणीच्या काठावर सोन्याचे भरतकाम केलेले असते. जॉर्जेट पैठणीवर जरीने नक्षीकाम केलेले असते.
‘साडी परिधान करणे’…एक कलाप्रकार
– साडी परिधान करणे हा एक कलाप्रकार आहे. काळाच्या ओघात साडी नेसण्याच्या पद्धतीत खूपच बदल झालेले आढळतात. गुजराती साडी, बंगालमधील ढाकई सिल्क, तामिळनाडूतील कांजीवरम साडी, बंगालमधील ढाकई सिल्क, बलुचारी या पारंपरिक साड्या, आसाममधील बनारसी साडी, मुगा सिल्क यासारख्या बनारसी साड्या..ब्राह्मणी, पेशवाई, राजलक्ष्मी, धोती, कोल्हापुरी…असे नऊवारीचे विविध प्रकार! प्रत्येक पद्धतीची साडी नेसण्याची पद्धत वेगळी आहे. हल्ली याकरिता ऑनलाईन, ऑफलाईन क्लासद्वारेही साडी नेसण्याची पद्धत शिकवली जाते.
– सुंदर नक्षीकाम केलेली साडी, त्यावर साजेसे दागदागिने, रंगसंगतीप्रमाणे ब्लाऊज यामुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते.
साडी नेसण्याचे फायदे…
साडीचा भारतीय संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा अशा कोणत्याही ऋतुत साडी शोभून दिसते तसेच कोणत्याही ऋतुत स्त्रिचे शरीर साडीमुळे झाकलेले राहते.
– बाजारात ऋतुमानानुसार साड्या उपलब्ध होतात.
– स्त्रीची शरीरयष्टी जाड अथवा सडपातळ. कशीही असली तरी तिला साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसते.
– सण, समारंभ, लग्नकार्य…अशा कोणत्याही सोहळ्याकरिता साडी हा असा पारंपरिक पोषाख आहे. ज्यामुळे परंपरा जोपासली जाते.
– साडीमुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-थंडीच्या दिवसांत साडी उबदर, तर उन्हाळ्यात कॉटनच्या साड्यांमुळे शरीराला थंडावा मिळतो.
-आधुनिक काळात साडीच्या वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध आहेत.
– साडीच्या पदरात दोन्ही हात व्यवस्थित झाकले जातात.
-साडी नेसल्याने शरीरात सकारात्मकत निर्माण होते.
परंपरेशी जोडल्याचे प्रतीक…
‘साडी’वर केलेले भरतकाम, विविध प्रकारचे नक्षीकाम करण्यासाठी रेशमी दोऱ्यांचा वापर केला जातो. याकरिता कलाकारांचे पिढ्यानपिढ्यांचे कौशल्य वाढीस लागते. त्यामुळे साडी परिधान केल्याने परंपरेची जोपासना होते. कलेच्या माध्यमातून इतिहास जपला जातो याशिवाय स्त्रीला सुरक्षितता प्रदान करणारे , आरामदायी, हालचालींसाठी अडथळा न आणणारा, व्यक्तिमत्त्वाची छाप समाजावर उठवणारा असा हा पोषाख आहे.
‘ट्रेंडी’ साड्या
आज सोशल मिडियावर साडी वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ट्रेंड होताना दिसते. हल्ली साडी शिवूनही मिळते. जी वापरायला अत्यंत सोपी आणि सुलभ असते. ऑफिस किंवा कॉकटेल पार्ट्यांसाठी साडीवर जॅकेट परिधान करणे, पँट किंवा स्कर्टसह फ्युजन सारीही परिधान केली जाते. अशा आधुनिक शिवणीच्या साड्या कोणताही समारंभ, कार्यालय किंवा अगदी घरीही परिधान करता येऊ शकतात. मुख्य म्हणजे महिलांना मोहक, सुंदर आणि प्रभावी दिसण्यासाठी ‘साडी’ हा भारतीय परंपरेचा अनमोल ठेवा सदैव जपला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community