International Women’s Day : वर्तमानात जगण्याचा मंत्र विसरता येणार नाही !

57
International Women’s Day : वर्तमानात जगण्याचा मंत्र विसरता येणार नाही !

माजी आशियाई चॅम्पियन आणि २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या रायफल नेमबाज दीपाली देशपांडे यांची भारताच्या राष्ट्रीय रायफल प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांचाच एक शिष्य स्वप्निल कुसाळेनं अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलं आहे. जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात असा अनोखा क्षण उलगडला, जेव्हा शिष्य स्वप्निल राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार स्वीकारत आहे. तर गुरु दीपाली यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या दीपाली यांनी स्वत: २००५ मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकण्यापासून ते २०२५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधी ऋजुता लुकतुके यांनी दीपाली देशपांडे (Deepali Deshpande) यांना विविध विषयांवर बोलतं केलं. (International Women’s Day)

(हेही वाचा – Veer Savarkar यांना भारतरत्न देण्याची BJP आमदाराची मागणी)

क्रीडा क्षेत्रात जे दोन महत्त्वाचे पुरस्कार आहेत, खेळाडू म्हणून अर्जुन आणि प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य, ते आता तुमच्याकडे आहेत. जानेवारी महिन्यातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान झाला आहे. त्याविषयी काय भावना मनात आहेत?

१९८७ मध्ये आम्ही नेमबाजीला सुरुवात केली, तेव्हा नेमबाजी खेळाची देखील भारतात सुरुवात होत होती. त्यामुळे सगळं आमच्यासाठी नवीन होतं. तोपर्यंत भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये खेळणं म्हणजे स्वप्नासारखं होतं. जे ऑलिम्पिक कोटा बाकीचे खेळाडू टाकून देत, ते आपल्या वाट्याला येत. पण, आमच्या पिढीपासून ऑलिम्पिकसाठी मेहनत घ्यायला सुरुवात झाली. २००४ चं अथेन्स ऑलिम्पिक पहिलं असं ऑलिम्पिक होतं, जिथे आम्ही ७ खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रता आमच्या हिंमतीने आणि कामगिरीने मिळवली होती. पुढे मग राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा यांनी देशाला ऑलिम्पिक पदकही मिळवून दिलं. अशी ही आमची देशातील व्यावसायिक नेमबाजांची पहिली धडपडणारी पिढी होती. तेच प्रशिक्षणाच्या बाबतीत घडलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा आणि पदकांचा अनुभव असणाऱ्या आमच्या सारख्या खेळाडूंना रायफल असोसिएशनने पुढे विचारलं की, तुम्ही उगवत्या खेळाडूंना प्रशिक्षण द्याल का? आमच्यासाठीही ज्या खेळाने आम्हाला सर्व काही दिलं, त्या खेळाला काही तरी परत करणं अगदी स्वाभाविक होतं. त्यामुळे २०१२ मध्ये मी ज्युनिअर गटातील रायफल खेळाडूंच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आमच्या पिढीसाठी हा अगदी स्वाभाविक अनुभव होता. (International Women’s Day)

(हेही वाचा – Aurangzeb च्या नावे भरणाऱ्या उरसावर बंदीची मागणी)

अलीकडेच बॅडमिंटन राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले आहेत की, मी ट्रेनींना विचारतो, तुमच्या आई-वडिलांकडे पैसा असेल तरंच खेळाकडे वळा! तुमचा याबाबतीत वैयक्तिक अनुभव काय आहे?

गोपीचंद यांच्या वक्तव्याचे विविध पैलू आहेत. एकाच चष्म्यातून त्याकडे पाहता येणार नाही. खेळात असं होतं की, पहिल्या तीन खेळाडूंनाच पदकं मिळतात, त्यांच्याकडेच नोकऱ्या चालून येतात. त्यांना सगळे लाभ मिळतात. पण, या तीन जागांसाठी हजारो लोक आपापसात स्पर्धा करत असतात. इतरांना मात्र त्या मानाने फारसा फायदा होत नाही. दुसरीकडे, काही राज्यांमध्ये पालक मुलांना खेळात अशासाठी टाकतात, की, विविध शिबिरं आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये निदान मुलांची जेवणाची सोय होते, पालक मुलांना दोन वेळ जेवायलाही घालू शकणार नसतात. दोन्ही प्रकारचे अनुभव मी भारतात घेतले आहेत. त्यामुळे गोपीचंद म्हणाले ते खरं असलं तरी त्यावर उपायही आहे की, आपल्याकडे खेळाडूंसाठी अशी यंत्रणा उभी राहील, ज्यात त्यांचा उदरनिर्वाह चालेल याचीही काळजी घेतली जाईल. कारण माझ्यामते, खेळ हा फक्त पदकं जिंकण्यासाठी महत्त्वाचा नाही. तर तुमचा शारीरिक आणि मानसिक विकास त्यातून होत असतो. आणि त्याकडेही दुर्लक्ष होऊन चालणार नाही. (International Women’s Day)

(हेही वाचा – Maharashtra Economic Survey : २०२६ मध्ये ६० वर्षांवरील महिलांची संख्या वाढणार !)

तुमची नेमबाजीची सुरुवात कशी झाली? या प्रवासात कुणी प्रोत्साहन दिलं? कुणी पाय खेचले?

मी स्वत:ला नेहमीच नशीबवान समजत आले आहे. आमच्यावेळी या क्षेत्रात आतासारखी स्पर्धा नव्हती. आम्ही आमच्याशीच स्पर्धा करायचो. एनसीसीमध्ये असताना नेमबाजीला सुरुवात झाली होती. तीन वर्षं मी रायफल हाताळत होते. पण, भीष्मराज बाम यांनी पहिल्यांदा व्यावसायिकरित्या नेमबाजी करण्याचा विश्वास दिला. त्यांना देशाचा नेमबाजी चमू तयार करायचा होता आणि ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत २४ पदकं असतात हे त्यांनी हेरलं होतं. म्हणून त्यांनी एनसीसीच्या मुलांना महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर बोलवलं आणि तिथून सहज मी, अंजली भागवत, सुमा शिरुर यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासात अडथळे, व्यक्तींनी नाही तर परिस्थितीने आणले. मला वास्तूविशारद अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यावर दोन वर्षं ब्रेक घ्यावा लागला. कारण, वडिलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीसाठी पैसा खर्च करणं मान्य नव्हतं. त्यांना ते परवडणारंही नव्हतं. त्यामुळे मी आधी वास्तूविशारद झाले आणि मग पुन्हा नेमबाजी सुरू केली. हा परिस्थितीचा भाग होता. (International Women’s Day)

आंतरारष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास कसा झाला?

१९९१ मध्येच भारतात पहिले आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आले. १९९९ मध्ये पहिल्यांदा लाझलोस सुचा हे हंगेरियन कोच रायफल नेमबाजीसाठी आले. त्यांनी आपल्या सेटअपमधील अनेक गोष्टी बदलल्या. आमचं साहित्य बदललं. आधुनिक जगाशी आमची ओळख करून दिली. तंत्र बदललं आणि तिथून पुढे एका महिन्यातच मी ३९० गुणांपासून ३९९ गुणांवर पोहोचले. तेव्हाचा माझा तो विश्वविक्रम होता. अंजलीनेही त्या-च सुमारास ३९८ गुण मिळवले आणि तिथून आम्हाला वाटलं की, गुण मिळवणं सोपं आहे. तोपर्यंत आमच्यामध्ये प्रचंड न्यूनगंड होता. पण, आता कळलं की, फक्त साधनं बदलायची गरज होती. आम्ही चांगल्याच होतो. १९९९ पासून भारतीय नेमबाजीचा आलेख चढता राहिला आहे. (International Women’s Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.