जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?

तो कुणाच्या संपर्कात होता, अंडरवर्ल्डचे त्याचे कनेक्शन कसे जोडले गेले, याबाबत माहिती मिळवण्यात येत आहे.

177

दिल्लीच्या विशेष पथकाने राजस्थानच्या कोटा येथून अटक केलेला आंतकवादी जान मोहम्मद उर्फ समीर कालिया शेख हा मूळचा मुंबईतील सायन इथे राहणारा आहे. पत्नी आणि दोन मुलींसह जान मोहम्मद हा सायन धारावी मधील केलावखार येथील सोशल नगर येथे राहत होता.

असा करत होता खोलीचा वापर

सोशल नगर येथे असलेले जान मोहम्मदचे घर ‘वन प्लस वन’ आहे. खालच्या खोलीत तो पत्नी आणि मुलीसोबत राहत होता व वरचा मजला त्याने पूर्वी भाडेतत्वावर दिला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने भाडेकरू कडून घर रिकामे करुन घेतले. त्यानंतर तो वरचा मजला स्वतःसाठी वापरत होता. वरच्या मजल्यावर कुटुंबातील सदस्यांना देखील प्रवेश नव्हता, अशी माहिती जान मोहम्मद राहत असलेल्या चाळीतील शेजाऱ्यांकडून समोर आली आहे. जान मोहम्मद हा अनिस इब्राहिम या संबंधित व्यक्तीसोबत बोलताना या खोलीचा वापर करत असावा. तसेच तो इंटरनेट कॉल मार्फत अनिस इब्राहिम आणि इतरांच्या संपर्कात असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून जान मोहम्मदच्या संपूर्ण खोलीची बारकाईने तपासणी सुरू असल्याचे समजते.

(हेही वाचाः दहशतवादी जान महंमदचे कुटुंबीय ताब्यात! रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी )

दारुगोळा आणि शस्त्रांचा साठा

जान मोहम्मद हा किरकोळ टॅक्सी चालक होता. २००२ मध्ये जान मोहम्मद याच्यावर धारावी पोलिस ठाण्यात स्थानिक पातळीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. जान मोहम्मदने मूलचंद लाला या साथीदाराच्या मदतीने मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रे हाताळली आणि ती सुखरुप उत्तर प्रदेशातील एका गावात दडवून ठेवली होती, याच्यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही.

पोलिसांकडून कसून चौकशी

दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर मुंबई पोलिस तसेच राज्यातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांचे एक पथक मुंबईत जान मोहम्मदच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी आल्यानंतर मुंबई पोलिस यंत्रणेला जाग आली आणि त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा, एटीएसचे पथक धारावीत दाखल झाले असून, जान मोहम्मद बाबतची माहिती आणि तो कुणाच्या संपर्कात होता, अंडरवर्ल्डचे त्याचे कनेक्शन कसे जोडले गेले, याबाबत माहिती मिळवण्यात येत आहे.

(हेही वाचाः दहशतवाद्यांचा कट : मुंबई रेल्वे स्थानकांची केलेली रेकी! गृहमंत्र्यांची उच्च स्तरीय बैठक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.