महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या केंद्रीय तपास यंत्रणेच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी यांची १ वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्याचे आदेश केंद्रीय गृहविभागाकडून करण्यात आले आहे.
अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याबद्दल…
अतुलचंद्र कुलकर्णी हे १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यातील महत्वाचे पदावर काम केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील कारागृह विभागात करण्यात आली होती. यापूर्वी कुलकर्णी यांनी मुंबईच्या गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त पद भूषविले आहे, तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काही वर्षे त्यांनी काम बघितले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेचे पोलीस महानिरीक्षक हे पद आता तात्पुरते अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर श्रेणीसुधारित म्हणून करण्यात आले आहे. त्यानंतर आता कुलकर्णी यांची ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत करण्यात आली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – मुंबई पोलीस दलातील ‘बॉम्ब स्कॉड’ एक दुर्लक्षित विभाग )
कुलकर्णी यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे राज्य सरकारला केंद्रीय गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडे राज्यातील महत्वाचे खटले सुरू आहे, त्यात अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्याकांड आणि अलिकडे एनआयएने डी कंपनी विरोधात सुरू केलेल्या कारवायाचा समावेश आहे. कुलकर्णी यांनी काही काळ एटीएस प्रमुख म्हणून काम पाहिल्यामुळे त्यांची केंद्रातील ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
Join Our WhatsApp Community