राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. केतकी चितळे आणि वाद हे काही नवे नाही. कधी मालिकांवरून तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट यामुळे ती आणि वाद याचं समीकरण ठरलेलं आहेच. आता ती पुन्हा शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान, पवारांविरोधात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेने सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही, का असा उलट सवाल रविवारी ठाणे न्यायालयात केला.
(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
केतकीने स्वत:च बाजू न्यायालयात मांडली
रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी केतकीला हजर केले होते. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडल्याचे दिसून आले. केतकीने न्यायालयात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती.
काय म्हणाली केतकी न्यायालयात…
सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही का? मी कोणी राजकीय नेता नाही की, माझ्या लिखाणाने लगेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी सामान्य व्यक्ती आहे. जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचा दावाही तिने केला, तसेच ही पोस्ट स्वखुशीने केल्याचेही तिने यावेळी स्पष्टपणे सांगितले.
Join Our WhatsApp Community