पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी एका हिंदू गर्भवतीची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करताना, नवजात अर्भकाचे शीर धडापासून वेगळे झाले. त्याच अवस्थेत बाळाला पुन्हा मातेच्या पोटात ठेवले. यामुळे या महिलेचा जीवही धोक्यात आला.
सिंध सरकारने याचा तपास करुन दोषींचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली आहे. जामेशोरु येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अॅंड हेल्थ सायन्सेस च्या (एल्यूएमएचएस) स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख प्राध्यापक राहिल सिकंदर म्हणाले, की थारपरकार जिल्ह्यातील दुर्गम भागातील भील हिंदू समाजातील महिला त्यांच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) दाखल झाली होती. तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने, अननुभवी कर्मचा-यांनी तिची प्रसूती केल्याने रविवारी ही दुर्दैवी घटना घडली.
( हेही वाचा: शिवसेना सोडणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले )
स्वतंत्र चौकशी होणार
या क्रूर प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा आदेश सिंध आरोग्य सेवेचे सरसंचालक डाॅक्टर जुमान बहोतो यांनी दिला आहे. या घटनेत नेमके काय झाले? हे समिती शोधून काढेल. विशेषत: छाछरोममधील आरएचसीमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या अनुपस्थितीची खास चौकशी करण्यात येईल.