हमासने इस्त्रायलवर (Israel-Hamas Conflict) रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने हमासचा खात्मा करेपर्यंत हे युद्ध सुरू राहिल, असा निश्चय इस्त्रायलने व्यक्त केला आहे. त्यामुळे या युद्धाची धुमश्चक्री दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता आहे, मात्र इस्त्रायलने युद्ध थांबवण्यासाठी हमासला पर्याय दिला आहे.
या युद्धामुळे जागतिक वातावरण तापले आहे. काही देश इस्त्रायलच्या बाजूने आहेत, तर काही देश पॅलेस्टाइनच्या बाजूने आहेत. त्यामुळे इस्त्रायलच्या प्रस्तावाला काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याबाबत जगभरात चर्चा होत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आतापर्यंत दोन्ही देशांतील हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागून हवाई हल्ले केले जात आहेत. हे युद्ध कधी थांबेल, याची काहीही खात्री देता येत नाही. इस्रायलने युद्धविरामाचा एक पर्याय सुचवला आहे. तो पर्याय हमासला मान्य असेल, तरच हे युद्ध थांबू शकतं, असे इस्त्रायल लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स म्हणाले आहेत.
लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स यांनी ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, हमासने पूर्णपणे आत्मसमर्पण करून ओलिसांना सोडल्यास युद्धविराम केला जाईल. जेव्हा हमास नष्ट होऊन भविष्यात कधीही इस्त्रायली नागरिकांना नुकसान पोहोचवण्याची हिंमत करणार नाहीत, तेव्हाच युद्ध संपेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.