इस्त्रायल आणि हमास युद्धाचा (Israel-Palestine Conflict) आजचा १०वा दिवस. दहा दिवस उलटूनही अजूनही या युद्धाची धुमश्चक्री संपलेली नाही. हजारो निष्पाप, निरपराध नागरिक आणि शेकडो सैनिक आणि दहशतवादी या युद्धात मारले गेले. या युद्धात २ हिंदुस्थानी महिलांना वीरगती प्राप्त झाली, अशी माहिती समोर आली आहे.
लेफ्टनंट ऑर मोजेस (२२) आणि इन्स्पेक्टर किक डोक्राकर अशी हमासच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वंशाच्या महिला सेनिकांची नावं आहेत. ऑर मोजेस या होम फ्रंट कमांडमध्ये कार्यरत होत्या, तर किम डोक्राकर सीमा पोलीस दलात तैनात होत्या. या युद्धात इस्त्रायलचे २८६ सैनिक आणि ५१ पोलीस शहीद झाले आहेत.
(हेही वाचा – Mumbai Crime Branch : ४८ तासांत पोलिसांनी दिला ४२ तडीपार गुन्हेगारांना दणका )
इस्त्रायलमध्ये राहात असलेल्या भारतीय वंशाच्या मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, कारण अनेक इस्त्रायली नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. यापैकी अनेकांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती इस्त्रायलमधील भारतीयांनी दिली.
इस्त्रायलमधील तरुणीचा धक्कादायक अनुभव…
या हल्ल्यात शहाफ टॉकर ही भारतीय वंशाची महिला या हल्ल्यात थोडक्यात वाचली. शहाफचे आजोबा याकोव टॉकर हे १९६३ साली मुंबईहून इस्त्रायलला गेले होते. तिने या हल्ल्याबाबत सांगितले की, तिचा मित्र यानिर याच्यासोबत ती दक्षिण इस्त्रायलमध्ये आयोजित केलेल्या एका पार्टिला गेली होती. अचानक त्यांना आकाशात अनेक क्षेपणास्त्र दिसली. काही क्षेपणास्त्रं त्यांच्या आजूबाजूला पडताना त्यांनी पाहिले. ठिकठिकाणी आगीचे लोळ दिसू लागले. स्फोटांचा आवाज ऐकू येऊ लागला. लोकं रस्त्यावर सैरावैरा धावत होते. त्यानंतर पोलिसांच्या सूचना ऐकल्यामुळे शहाफ, तिचा मित्र यानिर आणि तेथील बहुसंख्य लोकांची सुखरूप सुटका होऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले, मात्र तिचा मित्र यानिर अजूनही या धक्क्यामुळे अजूनही सावरलेला नाही.