युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने म्हटले आहे की गाझा पट्टीतील (Israel-Palestine War) परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. इथे फक्त चार ते पाच दिवसांचे रेशन दुकानात शिल्लक असून येथे इंधनाचीही कमतरता जाणवत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामुळे मानवी संकटं दिवसेंदिवस वाढत आहेत. उत्तर गाझामध्ये राहणारे लोकं आपल्या जीवावर बेतलेल्या संकटातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी जीव मुठीत धरून पळत आहेत. या युद्धात उत्तर गाझामद्ये राहणारे ११ लाख लोक विस्थापित झाले आहेत, तर दक्षिण गाझामधील लोकं मोठ्या संख्येने खान युनिस या ठिकाणी पोहोचले आहेत, मात्र त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.
येथील संयुक्त राष्ट्र विश्व खाद्य कार्यक्रम (UNWFP)चे म्हणणे आहे की, गाझा पट्टीतील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत आहे. येथे केवळ चार ते पाच दिवसांचे रेशन दुकानात शिल्लक आहे. गाझा येथील दुकानातील धान्यसाठा संपत चालला आहे. गाझा पट्टीमध्ये चार ते पाच पिठाच्या गिरण्या असून त्यापैकी इंधनाअभावी फक्त एकच गिरणी सुरू आहे. इस्रायली लष्कर हमासवर जमीन, समुद्र आणि हवेतून सातत्याने बॉम्बफेक करत आहे.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : २ हजार अमेरिकन सैनिक इस्त्रायलमध्ये अलर्ट मोडवर, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा आदेश )
विश्व खाद्य कार्यक्रमचे (World Food Programme-WFP) मध्य पूर्व प्रवक्ते अबीर इतेफा यांनी सांगितले की, गाझामध्ये डब्ल्यूपीपीच्या 23 बेकरी आहेत, त्यापैकी फक्त पाच सुरू आहेत. एकंदरीत येथील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जखमींना औषधेसुद्धा मिळत नाहीत. येत्या काही महिन्यांत औषधांच्या तुटवड्यामुळे येथील अनेक हेल्थ क्लिनिक बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. गाझामधील सुमारे 11,000 लोक जखमी झाले आहेत
अपुरे पाणी, खाद्यपदार्थ, औषधांचा तुटवडा…नागरिकांची भटकंती
उत्तर गाझातून पळून जाऊन दक्षिण गाझामधील खान युनिस येथे पोहोचणाऱ्या पॅलेस्टिनींना सध्या भेडसावणारे सर्वात मोठे संकट म्हणजे पाणी.दक्षिण गाझामध्ये पाण्याची एकच पाइपलाइन आहे आणि ही पाइपलाइन दिवसातून केवळ तीन तास सुरू असते, त्यामुळे खान युनिसच्या सुमारे एक लाख लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकांना मर्यादित पाणी मिळत आहे. संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की पॅलेस्टिनींसाठी पाणी हे सर्वात मोठे संकट आहे, कारण पाण्याशिवाय येथे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे डीहायड्रेशन आणि इतर आजारांचा सामनाही नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. येथे होणारा ब्रेडचा पुरवठाही अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे लोकं भाकरी घेण्यासाठी लांबलचक रांगा लावत आहे. रांगेत त्यांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते.