मलजल प्रक्रियेतील गाळापासून ऊर्जा की खत निर्मिती प्रकल्प

142

मागील पाच वर्षांपासून निविदेत अडकून पडलेल्या मुंबई मल जल प्रक्रिया केंद्र उभारणीच्या कामांना अखेर महापालिका प्रशासकांनी मंजुरी दिल्याने आता लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. परंतु या प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या गाळापासून निर्माण होणाऱ्या जैव वायूपासून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात यापासून खत निर्मिती प्रकल्पच राबवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ऊर्जा निर्मितीच्या नावावर महापालिकेने खत निर्मिती प्रकल्पच राबवण्याचा विचार केल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : भारताने घेतली अग्नी- 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी)

मुंबई महानगरात एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. वरळीमध्ये (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे येथे (३६० दशलक्ष् लीटर प्रतिदिन) मालाडमध्ये (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन) घाटकोपरमध्ये (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) धारावीमध्ये (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) भांडुपमध्ये (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि वेसावे (वर्सोवा) येथे (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन) याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज होता. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याबाबतचे प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केले. भांडुप वगळता इतर केंद्रांचे प्रस्ताव मंजूर करण्यात अ आले असून या मंजूर प्रस्तावांमध्ये मलजलावर प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या गाळावर प्रक्रिया करून मालाड, मानखुर्द अथवा महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी वाहून नेत त्याचे समतलीकरण करणे तसेच या गाळापासून निर्माण होणाऱ्या जैव वायूपासून ऊर्जा निर्मिती करणे अशाप्रकारे या प्रस्तावात म्हटले आहे.

खत निर्मिती प्रकल्प राबवण्याचा विचार

परंतु प्रत्यक्षात ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याऐवजी महापालिका प्रशासनाने यापासून खत निर्मिती प्रकल्प राबवण्याचा विचार करत आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याशी संपर्क साधला असता तरी त्यांनी मल जल प्रक्रिया केंद्रातून निघणाऱ्या गाळापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवला जाणार नसून त्या गाळापासून खत बनवले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.