नायर रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांमुळे संपूर्ण मुंबईसह राज्यात संतापाची लाट उसळलेली आहेत. त्यातच आता महापालिकेच्या या प्रमुख रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करायला लावली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ५५ वर्षांनंतर सेवा सातत्य पुढे चालू ठेवण्यासाठी वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. या वैद्यकीय तपासणीसाठी जाणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वेगळ्या अनुभवातून जावे लागत असून तीन ते चार वेळा रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून जे आपल्याच कर्मचाऱ्यांचे होऊ शकत नाही, बाहेरुन येणाऱ्या सामान्य रुग्णांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
वैद्यकीय तपासणी बंधनकारक
मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी, कामगारांचे सेवा निवृत्तीचे वय हे ५८ असून यापूर्वी ५५ वर्षांनंतर पुढील सेवा सातत्य ठेवण्यासाठी खातेप्रमुखांच्या परवानगीने मंजुरी दिली जात होती. परंतु कोविडनंतर महापालिका प्रशासनाने ५५ वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा ५८ वर्षांपर्यंत कायम ठेऊन त्यांची सेवा सातत्य ठेवण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कुपर या चार रुग्णालयांमधून वैद्यकीय तपासणी करून त्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पुढील सेवा सातत्य कायम ठेवले जाणार आहे.
नर्स, तंत्रज्ञ व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची उर्मट उत्तरे
महापालिकेच्या या निर्णयानुसार वयाची ५५ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आता या रुग्णालयांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु प्रत्यक्षात या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सर्वसामान्य रुग्ण ज्याप्रमाणे अर्ज भरुन तपासणी करतात, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना इतर रुग्णांसह रांगेत उभे राहून तपासणी करावी लागत आहे. आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत, याची ओळख दिल्यानंतरही येथील नर्स, तंत्रज्ञ व रुग्णालयीन कर्मचारी हे उर्मट उत्तरे देताना दिसत आहे. चार ते पाच रुग्णांच्या तपासणीनंतर तुमची तपासणी करू असे सांगत ते रांगेत उभे राहण्याच्या सूचना करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी तसेच भीतीही पसरलेली आहे.
असा आला अनुभव
महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केईएम रुग्णालयात सकाळी आठ वाजता बोलावण्यात आले होते. त्यानुसार सकाळी साडेसात वाजता पोहोचलो. पण प्रत्यक्षात येथील कर्मचारी दहा वाजता पोहोचले. त्यानंतर तब्बल चार वेळा रक्त तपासणीसाठी काढले. तर एक्स रे काढण्यासाठी दोन तासांची प्रतीक्षा करावी लागली. पण एक्स रे घेण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा केल्यानंतर, एक्स रेच खराब आल्याने पुन्हा काढण्यात आला. मात्र, एवढे सर्व करूनही ‘पुढील आठवड्यात याच दिवशी ओपीडीमध्ये या’, असे सांगण्यात येते. त्यामुळे आतापर्यंत तीनदा रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागले असून येथील कर्मचाऱ्यांची रुग्णाच्या नातेवाईकांशी सोडा, आपल्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी त्यांना सौजन्याने बोलता येत नाही, ते रुग्णांशी आणि नातेवाईकांशी कसे वागत असतील याची कल्पना येते, अशा शब्दात त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
( हेही वाचा : ‘सागरा प्राण तळमळला’…112 वर्षे पूर्ण! विरार येथे केले स्मरण )
प्रशासनाला आपल्याच कर्मचाऱ्यांची चिंता नाही
महापालिकेने जेव्हा निर्णय घेतला होता, तेव्हा प्रत्येक रुग्णालयात एक स्वतंत्र यंत्रणा उभी करून एकाच जागी सर्वप्रकारच्या तपासणी करण्यात याव्या अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु प्रशासनाला आपल्याच कर्मचाऱ्यांची चिंता नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणी वेळेवर होत नसल्याने आणि तपासणी होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेता येत नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने खासगी रुग्णालयांमधून ही सुविधा उपलब्ध करून घेतली. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांमागे तपासणीसाठी पैसे मोजले जात आहे. त्यामुळे जर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हे करता येत नसेल तर, महापालिकेचे कर्मचारी अशा रुग्णालयांमध्ये जावून आपली तपासणी करून घेतील आणि त्यासाठीचे शुल्कही देतील. प्रशासनाने ते प्रमाणपत्र ग्राह्य धरावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
Join Our WhatsApp Community