ITI विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार!

176

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. दहावीनंतर आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेत प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. याचा जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

प्रवेशाच्या ३ फेऱ्या होणार

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या २ फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या घेण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे लोकार्पण

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ वर्ष २०१५ पासून dtemaharashtra.gov.in या URL वर कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार यांच्या धोरणानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ dte.maharashtra.gov.in वर उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन व अद्ययावत संकेतस्थळाचे पुनः लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

शिष्यवृत्ती योजनांची, प्रवेशासंबंधीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

प्रथम वर्ष पदविका (१०वी नंतर)-http://poly22.dte.maharashtra.gov.in

प्रथम वर्ष पदविका (१२वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.