इंग्रज राजवटीतही विधीमंडळात जाण्याचा मान मिळवणारे ‘हे’ आहेत पहिले मराठी पुढारी

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाजूला केलं तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. पण महाराष्ट्राला विशेषतः मुंबईला इंग्रजांच्या काळात सुद्धा वैभव प्राप्त करुन देण्यात मराठी माणसाचे मोठे योगदान आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे.

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव. नानांचा वडिलोपार्जित जवाहि-याचा व्यवसाय होता. त्याकाळी अर्ध्या मुंबईचे मालक अशी नानांची ख्याती होती. मुंबईचे शिल्पकार,मुंबईचा अनभिषिक्त सम्राट अशीच नाना शंकरशेठ यांची त्यावेळी ओळख होती. इतकंच नाही तर मुंबई इलाख्याच्या विधीमंडळात सदस्यत्व मिळवण्याचा पहिला मान मिळाला होता तो जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांनाच.

बॉम्बे असोसिएशनची स्थापना

भारतीयांना विधीमंडळात स्थान देऊन त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडता यावेत यासाठी देशभरातील अनेक संस्थांनी त्या काळी प्रयत्न केले होते. त्यावेळच्या मुंबई इलाख्यातही भारतीयांना विधीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्षपद नाना शंकरशेठ यांनी भूषविले होते. नानांनी बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून सरकारला जनतेची गा-हाणी सांगून त्यांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली.

(हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जानव्याचे महत्व सरकारी पुस्तकातून वगळले)

पहिले महाराष्ट्रीयन पुढारी

1857 च्या राष्ट्रीय उठावानंतर विधीमंडळात भारतीयांना स्थान देऊन त्यांचा ब्रिटीश सरकावरील रोष कमी करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. त्यासाठीच त्यांनी 1861 साली इंडिया कौन्सिल्स अ‍ॅक्ट हा कायदा केला. या कायद्याद्वारे मुंबई,मद्रास,बंगाल यांसारख्या प्रांतांमधील विधीमंडळांत भारतीयांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधीमंडळाचे पहिले मराठी सदस्य होण्याचा मान जगन्नाथ शंकरशेठ यांना मिळाला. नाना शंकरशेठच पहिले महाराष्ट्रीयन पुढारी ठरले.

इंग्रजांनीही केला गौरव

नाना शंकरशेठ हे ख-या अर्थाने जनतेची सेवा करणारे सेवक आणि समाजसुधारक होते. त्याकाळात त्यांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले. इंग्रज सरकारनेही त्यांना Justice of the Peace ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता. इतकंच नाही तर भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करण्याचा मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. 31 जुलै 1865 रोजी नानांचा मृत्यू झाला.

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

नानांची इतर कार्ये

  • बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना (1822)
  • एल्फिन्स्टन हायस्कूल (1824) आणि एल्फिन्स्टन कॉलेज(1834)ची स्थापना
  • मुंबईतील जे.जे. रुग्णालयाच्या उभारणीत मोठा वाटा
  • मुंबईतील पहिल्या विधी महाविद्यालयाची(Law College) स्थापना
  • परकीयांप्रमाणेच भारतीयांनाही कलाविषयक शिक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील नामवंत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेसाठी पुढाकार
  • मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी आणि तलावांची योजना
  • भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यान (राणीची बाग) आणि ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाची सुरुवात
  • मुंबईतील पहिल्या नाट्यगृहाच्या स्थापनेची ‘नांदी’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here