केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक व महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल(भा.पो.से.) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल(C.I.S.F.)च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, आता त्यांच्या जागी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचा निर्णय, महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल(C.I.S.F.)च्या महासंचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांना नियुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने घेतला आहे. १ मार्च २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. ते महाराष्ट्राचे ४२वे पोलीस महासंचालक होते. पण आता C.I.S.F.च्या महासंचालकपदी त्यांची वर्णी लागल्याने, आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे, महासंचालक(न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य यांच्यावर पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात येणार असल्याचा निर्णय, महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागातर्फे घेण्यात आला आहे.
(हेही वाचा: पोलीस प्रमुखपदी कुणाची लागणार वर्णी?)
महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत हेमंत नगराळे यांच्यासोबतच, संजय पांडे, रश्मी शुक्ला, सुरेंद्रनाथ पांडे, रजनीश पांडे, परमवीर सिंह यांची नावेसुद्धा चर्चेत होती.