सध्याचे युग हे डिजिटल असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाइल फोन दिसताे. यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य या मोबाइलमध्ये अडकले आहे. याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यासह कौटुंबिक वातावरणावर देखील झाला आहे. घराघरातील टीव्ही, मोबाइलमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी या गावाने मुलांसाठी रोज दोन तास घरातील टिव्ही आणि मोबाइल बंद ठेवण्याचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमांतर्गत सर्वांचे मोबाइल, फोन संध्याकाळी सहा ते आठवाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.
(हेही वाचा – मंकिपॉक्सचं नाव बदलणार! लवकरच WHO घेणार निर्णय, ‘हे’ असणार नवं नाव)
जकेकूरवाडीत संध्याकाळी सहा ते आठ या वेळात मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन-अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव असून या गावातील मुले मोबाइलला तासन् तास चिकटून असतात, असे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. याचा सर्व परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होता. त्यामुळे जकेकूरवाडी गावाने हा निर्णय घेतला आहे.
असा राबविला जातो उपक्रम
जकेकूरवाडी या गावात रोज नियमाने टीव्ही, मोबाइल बंद करण्याची आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत ग्रामपंचायत भोंगा वाजवते. हा भोंगा वाजल्यानंतर आपला टीव्ही, मोबाईल, रेडिओ, लाऊड स्पीकर सर्व बंद करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे अशी सूचना आपोआप तेथील गावकऱ्यांना मिळते. राज्यातील हा दुसरा प्रयोग असून यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहितेची वाडी या गावात करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जकेकूरवाडी हे राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले गाव ठरले आहे.
Join Our WhatsApp Community