जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्याने, जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे, पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. तरुणीच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्याने जळगाव हादरले आहे.
तरुणीच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला आणि स्वत: पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. वर्षा कोळी आणि राकेश संजय राजपूत अशी मयत प्रेमयुगुलाची नावं आहेत.
स्वत: पोलीस ठाणे गाठत दिली खुनाची कबुली
चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसांत हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता, नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारुन तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले.
( हेही वाचा: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा )
पुढील तपास सुरु
राकेश संजय राजपूत याचे वर्षा कोळी हिच्यावर प्रेम होते. राकेश वर्षा हिच्या घरी आला. यावेळी लहान भावासह इतर तीन जणांनी राकेशला तसेच वर्षा या दोघांना दुचाकीवरुन बसवून चोपडा ते वराडे रोडलगत असलेल्या नाल्याजवळ आणले. याठिकाणी वर्षाच्या भावाने राकेशच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. त्यानंतर लहान भावाने बहिण वर्षाचा रुमालाने गळा दाबून तिची हत्या केली. या प्रकरणाची पुढील तपासणी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले हे करत आहेत. चोपडा शहरातील तरुण राहत असलेल्या रामपुरा तसेच तरुणी राहत असलेल्या रामपुरा शहरात सुंदरगढी भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community