जळगावातील जैवविविधता, वाघांचा संचार ध्यानात घेत नुकत्याच पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत जळगावात मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्राला सशर्त मंजुरी मिळाली. १२ वर्षांच्या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाववासीयांच्या मागणीला प्रतिसाद दिला. या घोषणेनंतर जळगावातील वन्यप्रेमी, गावक-यांमध्ये जल्लोष सुरु होते. राखीव क्षेत्रातील वाघांच्या जंगलात माणसांनी अतिक्रमण केल्याने या समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणीही वन्यजीवप्रेमी करत आहेत.
( हेही वाचा : मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या हजारीपार )
जळगावला लागून असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेली कित्येक वर्षे वाघांचा संचार होत आहे. जळगावातील केळींच्या बागांमध्ये वाघ वर्षानुवर्षे रमल्याचे दिसून येत आहे. मुक्ताई हा परिसर सध्या जळगावातील प्रादेशिक वनविभागाच्या अंतर्गत मोडतो. या भागांतील जंगल परिसराच्या टेहाळणीसाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचा मुद्दा चातक या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रमुख अनिल महाजन यांनी उपस्थित केला.
डोलारखेडा, चारठाणा, वाळला. पाकडी, लिमखेडी या जंगलानजीकच वसलेल्या गावांनी जंगलात अतिक्रमण करुन शेतीची लागवड सुरु केली. गेल्या चार-पाच वर्षांत ही अतिक्रमणे वाढली. ही वाढती अतिक्रमणे मेळघाटाच्या मार्गातून जळगावात रमलेल्या ८ ते १० वाघांच्या अधिवासाला निश्चितच बाधा देणारी ठरतील, अशी भीतीही महाजन यांनी व्यक्त केली. वनविभागाचे मनुष्यबळ अपुरे असल्याने मुळात या भागांत अतिक्रमणांबाबतही संबंधित अधिका-यांना पुरेशी कल्पना नाही, असे महाजन म्हणाले. याबाबत जनजागृती हवी जेणेकरुन वाघांच्या वावराबाबत अभयारण्याची आग्रही मागणी धरणा-या गावक-यांना भविष्यातील धोक्यांबाबतही कल्पना मिळेल, असेही महाजन म्हणाले.
वाघांबाबत गावक-यांमध्ये अफाट प्रेम
काही वर्षांपूर्वी डोलारखेडा गावांत एका वृद्धाचा जखमी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाघानेही दोन-तीन दिवसांनी प्राण सोडले. लोकांच्या मनातील राग लक्षात घेत वनविभागाने गावापासून दूर प्रदेशात वाघाचे अंत्यसंस्कार केले. अभयारण्य घोषित करण्यासाठी नियुक्त समितीची या घटनेनंतर बैठक झाल्यानंतर गावक-यांनी वनाधिका-यांचा चांगलाच समाचार घेतला. कित्येकदा गावकरी जंगलातील वाघीणीने जन्म दिलेल्या बछड्यालाही गावात दाखवण्यासाठी आणायचे, असे किस्से घडल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे देतात. गावक-यांमध्ये वाघाबद्दल प्रचंड आकर्षण आहे, त्यामुळेच गावक-यांच्या प्रयत्नांमुळेच आज अभयारण्य घोषित झाल्याची माहिती रिठे यांनी दिली.