जालन्यातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळच्या वेळी स्टील वितळणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण स्वरूपाचा होता की, या भट्टीचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाल्याचे दिसून आले. या दुर्घटनेत साधारण ८ ते १० कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – सत्ता गेली चुलीत; आमच्या वाटेला आले तर…, आक्रमक बच्चू कडूंचा राणांना इशारा)
दरम्यान, या झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर औरंगाबाद शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्यांमध्ये अनेक भीषण स्फोट झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकारानंतर स्टील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे अधोरेखित होत आहे.
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरु, पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी भेट दिली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप पोलीस प्रशासनाला मिळाली नसल्याने पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत. या भीषण स्फोटामुळे जालना औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि कामगारांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. पोलीस प्रशासनाने संबंधित स्टील कंपनीचे मालक आणि अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community