J&K: जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये अभिनेत्री अंबरीन भटची हत्या, दहशतवाद्यांचा शोध सुरू

88

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अंबरीन भटची हत्या केली. बुधवारी संध्याकाळी दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अंबरीन भट यांच्या घरी पोहोचले आणि अंबरीन भट यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांच्या भाच्यालाही गोळी लागल्याने तो जखमी झाला. अंबरीनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केली आहे. तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून, शोधकार्य सुरू आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी अंबरीनच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. अंबरीन ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. ती टीव्ही शोमध्ये काम करायची. दहशतवाद्यांनी तिची हत्या का केली हे कळू शकलेले नाही. याआधी त्यांना कोणतीही धमकीही देण्यात आली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले ​​आहेत. दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले आहेत. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा वेगाने खात्मादेखील करण्यात येत आहे.

( हेही वाचा: 26 मे हा दिवस भारतासाठी महत्वपूर्ण; का ते जाणून घ्या )

याआधीही झालेत असे भ्याड हल्ले

मे महिन्यातच जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ले झाले आहेत. मंगळवारी श्रीनगरमधील सौरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस कॉन्स्टेबल सैफुल्ला कादरी यांची हत्या केली. या हल्ल्यात त्यांच्या 7 वर्षांच्या मुलीलाही गोळी लागली होती. 13 मे रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांची घरात घुसून हत्या केली होती. तर, १२ मे रोजी बडगाममधील सरकारी कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट नावाच्या कर्मचाऱ्याचा जीव घेतला. राहुल यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी ठिकठिकाणी जोरदार निदर्शनेही केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.