मराठी साहित्यात विज्ञान साहित्य अल्प प्रमाणात असल्याबद्दल ज्येष्ठ वैज्ञानिक तथा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी खंत व्यक्त केली. मराठी साहित्याकडे पाहिले की, त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञान कथा लेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात, असेही डाॅ. नारळीकर म्हणाले. नाशिक येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन झाले. याचे डॉ. नारळीकर नियोजित अध्यक्ष आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना संमेलनाला उपस्थित राहता आले नाही.
तर कोणाचा आक्षेप असू नये
विज्ञान साहित्य म्हणजे काय? यावर डॉ. नारळीकर म्हणाले की, वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा मी विज्ञान साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.
सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात
उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात? हे सांगताना डॉ. नारळीकर यांनी सांगितले की, या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. आपण अशा काही निकषांवर दृष्टिक्षेप टाकू या. उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोचला की ठरवेलच. विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधांवर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी, असेही डॉ. नारळीकर म्हणाले.
( हेही वाचा : नागपुरातील दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन )
Join Our WhatsApp Community