Artist : जयेश मेस्त्री यांची राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीत झाली नियुक्ती

197

मुंबईतील लेखक जयेश मेस्त्री यांची ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन’ (महाराष्ट्र शासन) या योजनेंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा समितीवर नियुक्ती झाली आहे. वृद्ध कलावंत आणि साहित्यिक यांना मानधन देण्याचे कार्य या समितीद्वारे केले जाते. ज्या व्यक्तींनी साहित्य व कला क्षेत्रात मोलाचे काम केले आहे व ज्यांचे वय ५० वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त आहे, ज्या कलावंत/साहित्यिकांचे उत्पन्न रु. ४८००० पेक्षा जास्त नाही, कलावंत/साहित्यिक इतर कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी नाहीत अशा साहित्यिक व कलावंतांना मानधन दिले जाते.

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समिती ही महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली एक समिती आहे. साहित्य व कला क्षेत्रात काम करणार्‍या वृद्ध कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रात किंवा कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे, तसेच कला आणि वाड्‌.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे असे वृध्द साहित्यिक / कलावंत थोडक्यात ज्यांनी साहित्य किंवा कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे व यावरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता असे मान्यवर यासाठी पात्र ठरवण्यात येतात.

जयेश मेस्त्री हे ’सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (केंद्र सरकार) येथे सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. ते गेली १७ वर्षे लेखन, नाट्य, कला या क्षेत्रात कार्यरत असून राजकीय विश्लेषण देखील करीत आहेत. विविध नियकालिकांत त्यांनी लेखन केले आहे. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ’छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकर हे आपले आदर्श आहेत. महाराष्ट्र शासनाने दिलेली ही कामगिरी मी प्रामाणिकपणे पार पाडेन व महाराष्ट्राची सेवा करेन.’ असे जयेश मेस्त्री यांनी म्हटले आहे तसेच त्यांना हे उत्तरदायित्व सोपवल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे.

(हेही वाचा Instagram : इंस्टाग्राममधील टेम्प्लेट ब्राऊझरच्या नव्या फीचरने घातला धुमाकूळ; जाणून घ्या वैशिष्ट्ये)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.