… म्हणून होणार जेट एअरवेजच्या उड्डाणाला विलंब!

100

२०२२ च्या पहिल्या तिमाहीत जेट एअरवेज प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा व्यवस्थापनाचा दावा फोल ठरल्याचे समोर आले आहे. उड्डाण परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया अपूर्ण असल्याने जेट एअरवेजच्या उड्डाणाला विलंब होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे जेट एअरवेजचे उड्डाण सप्टेबरपर्यंत लांबणीवर पडले आहे.

(हेही वाचा – विमान प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ आली धावून…)

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या कंपनीचा उड्डाण परवाना कालरॉक आणि जलान यांच्या प्रस्तावास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने मंजुरी दिल्यानंतर तातडीने या परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज येणे अपेक्षित होते. मात्र, डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज दाखल न केल्याने पुढील प्रक्रियेस विलंब झाला आहे. येत्या मे महिन्यात जेट एअरवेजला उड्डाण परवाना मिळू शकतो, अशी माहिती हवाई वाहतूक महासंचालनालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

… त्यानंतरच मिळणार वाहतूकीस परवानगी

जेट एअरवेजला हा परवाना मिळाल्यानंतर पुढील काही दिवस उड्डाण परीक्षण करावे लागणार आहे. परीक्षणादरम्यान आढळणाऱ्या त्रुटी दूर केल्यानंतर डीजीसीएचे पथक पाहणी करणार असून त्यानंतर विमान वाहतूक करण्याची परवानगी दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमाने ताफ्यात दाखल होण्यासह उर्वरित संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सप्टेंबर महिना उजाडणार आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असून, पहिले उड्डाण दिल्ली-मुंबई या सर्वात वर्दळीच्या मार्गावरून केले जाणार असल्याची माहिती जेट एअरवेजकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.