बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या खाजगीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी यापूर्वी जे. जे. रुग्णालयात द्वारसभा घेण्यात आली होती आणि आता जे.जे.रुग्णालयातील परिचारिका राज्यव्यापी आंदोलनात सुद्धा सहभागी होणार आहेत.
( हेही वाचा : मुंबई महापालिका निवडणूक पावसाळ्यानंतर)
असे आहे आंदोलनाचे स्वरूप
दिनांक २३, २४, २५ मे २०२२ पासून मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन व सर्व जिल्ह्यात १ तास काम बंद आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहे. दिनांक २६ व २७ मे २०२२ रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर २८ मे २०२२ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जे.जे.रुग्णालय शाखेच्या परिचारिका सुद्धा सहभागी होणार आहेत.
रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो, तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील. असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community