जम्मू- काश्मीरमधील राजौरीमध्ये 1 जानेवारीला दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले होते. आता पुन्हा त्याच ठिकाणी सोमवारी IED स्फोट झाला आहे. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात हा स्फोट झाला.
1 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंवर हल्ला केला होता. या गोळीबारात चार हिंदूं ठार झाले. या घटनेत नऊ जण जखमी झाले असून, त्यात तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून हिंदूंना वारंवार लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ सोमवारी अनेक संघटनांनी राजौरी बंदची घोषणा केली होती. या आंदोलनादरम्यान IED स्फोट झाला
( हेही वाचा: जम्मू- कश्मीरमध्ये हिंदू कुटुंबांवर दहशतवादी हल्ला; 4 जणांचा मृत्यू, तर 9 जखमी )
पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीला ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हिंदूंवर गोळीबार केला होता, त्याच ठिकाणी सोमवारीही स्फोट झाला. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक आयईडीही जप्त केला आहे. दहशतवाद्यांनी इतरत्र आयईडी पेरले आहेत की नाही हे तपासण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलीस जवळपासच्या घरांची तपासणी करत आहेत.
लेफ्टनंट गव्हर्नर यांनी या हल्ल्याचा निषेध केला
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयाने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये एक्स-ग्रेशिया आणि सरकारी नोकरी दिली जाईल. त्याचबरोबर गंभीर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी डांगरी गावात पोहोचून पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.