क्रूझ प्रकरणी चर्चेत आलेल्या किरण गोसावीच्या सहाय्यक महिलेला अटक!

किरण गोसावी हा नवी मुंबईतून जॉब रॅकेट चालवत होता, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साईटवर आपले सावज शोधून त्याची फसवणूक करणे ही गुन्ह्याची पध्द्त वापरत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

84
क्रूझमधील रेव्ह पार्टी प्रकरणात साक्षीदार म्हणून चर्चेत आलेला किरण गोसावी याची सहाय्यक असलेल्या शेरबानो कुरेशीला पुणे पोलिसांनी मुंबईतील गोवंडी परिसरातून अटक केली आहे. बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शेरबानोला अटक करण्यात आली आहे. तिचा बॉस किरण गोसावी फरार असून पुणे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

किरण गोसावी हा फरार

पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात शेरबानो कुरेशी आणि किरण गोसावी या दोघांविरुद्ध २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी देण्याच्या नावाखाली या दोघांनी लाखो रुपये घेतले. मात्र नोकरी न देता फसवणूक केल्या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात किरण गोसावी आणि त्याची सहाय्यक शेरबानो कुरेशी या दोघे फरार होते. पुणे पोलिसांच्या फरासखाना पोलिसांनी सोमवारी किरण गोसावी याची सहाय्यक असलेली शेरबानो कुरेशीला गोवंडी येथून अटक केली आहे. किरण गोसावी हा फरार असून त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथके त्याच्या शोधासाठी राज्यातील काही जिल्ह्यात तसेच इतर राज्यात त्याचा शोध घेण्यात येत आहे.

बोगस व्हिसा आणि विमानाचे तिकीट पाठवले होते!

पालघर जिल्ह्यातील एडवन या ठिकाणी राहणाऱ्या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरी देण्याच्या नावाखाली किरण गोसावी याने ऑनलाइन लाखो रुपये घेऊन त्यांना बोगस व्हिसा आणि विमानाचे तिकीट पाठवले होते, मात्र विमानतळावर गेल्यावर हे दोन्ही बोगस असल्याचे कळताच या दोघांनी केळवे सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. किरण गोसावी हा नवी मुंबईतून जॉब रॅकेट चालवत होता, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साईटवर आपले सावज शोधून त्याची फसवणूक करणे ही गुन्ह्याची पध्द्त गोसावी वापरत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

…म्हणून किरण गोसावी आला चर्चेत 

एनसीबीने नुकत्याच केलेल्या क्रूझवरील कारवाईनंतर किरण गोसावीचा आर्यन खानसोबत एनसीबीच्या ताब्यात असताना एक सेल्फी छायाचित्र व्हायरल झाले होते. तसेच किरण गोसावी हा क्रूझवरील आरोपींना एनसीबी कार्यालयात घेऊन जात असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यावर किरण गोसावी चर्चेत आला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि भाजपच्या एका पदाधिकारी याचे पितळ उघडे करून हे दोघे एनसीबीच्या कारवाईत काय करीत आहे, असा सवाल केला होता. दरम्यान एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी आणि भाजप पदाधिकारी हे क्रूझ छापेमारी प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार असल्याचे स्पष्ट केले होते
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.