जोधपूरमध्ये ईदच्या पूर्वसंध्येला दोन गटात तुंबळ हाणामारी, पोलिसांवर दगडफेक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये सोमवारी रात्री उशिरा ध्वज, स्पीकरवरून सुरू झालेला गोंधळ थांबत नाही. मंगळवारी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सकाळी नमाजनंतर चांगलीच हाणामारी झाली. ही हिंसाचाराची दाहकता आमदारांच्या घरापर्यंतही पोहोचली आहे. भाजप आमदार सूर्यकांत व्यास यांच्या घराबाहेर काही लोकांनी बाईक पेटवली. सध्या पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा – शेलारांचा हल्लाबोल! म्हणाले, “शिवसेना हे फाटकं बनियान”)

राजस्थानमधल्या जोधपूर जिल्ह्यातल्या जलोरी गेट परिसरात सोमवारी रात्री उशीरा दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्यावर झेंडा फडकवण्यावरून दोन गटांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परशुराम जयंती आणि ईद दोन्ही एकाच दिवशी आहेत. या दिवशी कोणता झेंडा लावायचा यावरून या दोन गटांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पुन्हा दगडफेकीचे वृत्त समोर आले होते. त्याला सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. सोमवारी रात्री म्हणजेच ईदच्या पूर्वसंध्येला हा गोंधळ सुरू झाला. हिंसाचाराच्या घटनेनंतर राजस्थान सरकारने कारवाई केली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामध्ये डीजीपी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

जोधपूर येथे सोमवारी रात्री दोन समुदायांमध्ये वाद उफाळून आला. यामध्ये दगडफेक झाल्याने काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, ईदगाहच्या जवळील परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन गटात झालेला तणाव अधिक वाढला यानंतर दगडफेक सुरू झाली. मात्र सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असून पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद केली असल्याची माहिती मिळतेय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here