- सुप्रिम मस्कर
रांगोळी म्हटले की, दिवाळीचे दिवस आणि घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढणाऱ्या महिलांचे दृश्य! मात्र रांगोळीची (Rangoli) ही कला महाराष्ट्रातील अवघ्या ३० हजार लोकवस्ती असलेल्या एका गावातील काही पुरुष कलाकारांमुळे सातासमुद्रापार पोहचली आहे. त्या गावाचे नाव म्हणजे, नायगाव पूर्वेला वसलेले जूचंद्र हे गाव.
१९८० पासून मिळाला नवा रोजगार
म्हणून जूचंद्र गावाची ‘रांगोळीचे माहेरघर’ अशी विशेष ओळख आहे. प्रसिद्धीची कुठलीच हाव नसलेल्या या गावातील लोकांचा मिठाच्या आगाराचा आणि भातशेतीचा मुख्य व्यवसाय. परंतु १९८० नंतर या गावातील तरुणांच्या हाताला अजून एक रोजगार मिळाला. जूचंद्र गावातील शिवछत्रपती समाज सेवा मंडळाने १९८० साली गावात एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. अर्थातच या स्पर्धेसाठी ‘आपलं अंगण हेच व्यासपीठ’ हे तत्व वापरण्यात आले. त्यामुळे महिलांची ही रांगोळी (Rangoli) कला घरातील लहान मुलांपर्यंत पोहचली आणि त्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. गावातील तरुणांनी या स्पर्धेत हिरहिरीने भाग घेतला. त्यानंतर मंडळाने वसईतील ज्येष्ठ रांगोळीकार शंकर मोदगेकर यांना स्पर्धेच्या परीक्षणासाठी बोलावले. त्यावेळी मोदगेकर यांना जूचंद्र गावातील तरुणांनी काढलेली रांगोळी प्रचंड आवडली. त्यांनी गावातील तरुणांच्या हातात जादू असून त्यांना प्रशिक्षण दिल्यास रांगोळी (Rangoli) कलाकारांची नवी फळी तयार होईल, असे सांगून प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यास सांगितले. त्यानंतर शिवछत्रपती समाज सेवा मंडळाने प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी स्विकारली. ज्यामुळे मोदगेकर यांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर गावातील कलाकारांना रांगोळीच्या विस्तारित स्वरुपाची, रंगछटांच्या मुक्त उधळणीची आणि त्यातील बारकाव्यांची जाणीव झाली.
(हेही वाचा – येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार ; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा दावा )
एका रांगोळीला १० ते ११ तास लागतात
आजघडीला जूचंद्रला २५० हून अधिक रांगोळी कलाकार असून त्यात पुरुष कलाकार सर्वाधिक आहेत. त्यात भूषण पाटील, शैलेष पाटील, प्रणित भोईर, हर्षद पाटील, जयकुमार भोईर यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळेच महिलांना जशी सणासुदीला माहेरला जाण्याची ओढ असते. तशीच ओढ इथल्या कलाकारांना वर्षांच्या शेवटी दिवाळीत होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाची असते. या प्रदर्शनात कणा रांगोळी (ठिपक्यांची), व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, शिल्प रांगोळी, थ्रीडी, समाज जागृतीपर रांगोळी, भौमितिक रांगोळी, फ्लोरोसंट, पाण्याखालील, पाण्यावरील रांगोळी यांसारख्या अनेक प्रकारच्या रांगोळ्या चाहत्यांना पाहायला मिळतात. या रांगोळीसाठी दिवाळीआधी चार ते पाच दिवस गावातील तरुण कलाकार मंडळी मिळेल तसा वेळ देऊन प्रदर्शनासाठी रांगोळी साकारतात. एका रांगोळीसाठी (Rangoli) १० ते ११ तास प्रत्येक कलाकाराला लागत असतो.
‘गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड’ मध्ये नोंद
दरम्यान जूचंद्र गावातील रांगोळी कलेबद्दल, तिच्या इतिहासाबद्दल जाणून घेताना रांगोळी कलाकार तथा नृत्यदिग्दर्शक भूषण पाटील म्हणाले की, रांगोळी (Rangoli) कला जूचंद्र गावातील अनेक कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देते. आज मुंबईसारख्या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी आमच्या गावातील कलाकारांना निमंत्रण दिले जाते. तसेच मुंबईतील अनेक शाळांमध्ये इथले कलाकार प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे मोदगेकर सरांकडून जसे आम्ही रांगोळी कलेतील बारकावे शिकलो. तसेच बारकावे इतर नवोदितांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यासाठी ‘रजनी कला स्टुडिओ’ हे कलाकेंद्र सुरु केलेले आहे. या कलाकेंद्राच्या माध्यमातून भिंवडी, ठाणे याभागातील अनेक नवोदित कलाकारांना माफक दरात आम्ही रांगोळी प्रशिक्षण उपलब्ध करून देतो, अशी माहिती पाटील यांनी दिली. तसेच गावातील रांगोळी कलाकारांच्या सहकार्यातून भव्य दिव्य रांगोळी साकारून ‘गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड’ मध्ये नाव कोरण्याचा स्थानिक कलाकारांचा मानस आहे. मात्र यासाठी येणारा खर्च आणि इतर सहकार्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरु असल्याचेही भूषण पाटील यांनी सांगितले. त्यामुळे यंदा दिवाळीत आपणही जूचंद्र गावात जाऊन आवर्जून स्थानिक कलाकारांनी साकारलेले रांगोळी प्रदर्शन नक्की पाहा आणि त्यांच्या पाठिवर कौतुकाची एक थाप जरुर द्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community