हर्षद मेहताच्या ‘त्या’ सहका-याला अखेर अटक…कोण आहे तो?

दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने त्याला दिल्लीतील एका खेड्यातून अटक करुन मुंबईत आणण्यात आले आहे.

157

शेअर मार्केट घोटाळा ते ड्रग्स तस्करी असा ३० वर्षांचा प्रवास करणाऱ्या शेअर मार्केट घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षद मेहता याचा सहकारी निरंजन शहा, याला एटीएसने दिल्ली येथून अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक केली आहे. निरंजन शहा डीआरआय, एनसीबी आणि मुंबई नारकॉटिक्स विभागाच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून, मागील काही वर्षांपासून विविध राज्यांत वेष बदलून लपून बसला होता. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने त्याला दिल्लीतील एका खेड्यातून अटक करुन मुंबईत आणण्यात आले आहे.

शेअर बाजार ते अंमली पदार्थांचा व्यापार

निरंजन चिमणलाल शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा गुजरात राज्यात राहणारा शहा हा ८०च्या दशकात मुंबईत व्यवसायानिमित्त आला होता. शेअर बाजारात नशीब आजमावताना त्याची ओळख हर्षद मेहता याच्यासोबत झाली. त्यानंतर १९९० साली झालेल्या शेअर मार्केट घोटाळ्यात हर्षद मेहता सोबत त्याचे नाव देखील जोडले गेले होते. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत शहा याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर निरंजन शहा हा अंमली पदार्थाच्या व्यवसायकडे वळला. डीआरआय, एनसीबीच्या रडारवर असलेल्या शहाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक देखील झाली होती. मुंबई अंमली पदार्थ विरोधी विभागात देखील शहा याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. निरंजन शहा हा मुंबई आणि आसपासच्या शहरात अंमली पदार्थ पुरवठा करत होता.

(हेही वाचाः चक्क खोट्या नोटा देऊन फसवणुकीपासून वाचला)

वेष बदलून देत होता चकवा

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने १७ मार्च रोजी सोहेल युसूफ मेमन याला अडीच कोटी रुपये किमतीच्या एम.डी या अंमली पदार्थासह अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याने निरजंन याच्याकडून हे अंमली पदार्थ घेतल्याचे कबूल केले होते. एटीएसने या गुन्ह्यात निरंजन शहा याचा शोध सुरू केला होता. मात्र निरंजन शहा हा मुंबई बाहेर पळून गेला असून राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि हैदराबाद येथे वेष बदलून लुप्त फिरत असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

एटीएसची कारवाई

शहाचा शोध सुरू असताना तो दिल्लीतील एका खेड्यात असल्याची माहिती, एटीएसच्या जुहू युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएसचे पथक दिल्लीतील मुनेरक गाव येथे दाखल झाली. निरंजन शहा हा मुनेरक गाव येथे एक छोट्याशा झोपड्यात राहत होता व त्याने तो गरीब असल्याचे गावक-यांना भासवले होते. दरम्यान एटीएसच्या पथकाने त्याचा मुनेरका येथे शोध घेऊन, त्याला अटक केली आहे. मंगळवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

(हेही वाचाः कबाबच्या सळईने फाडले काळीज…कारण वाचून थक्क व्हाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.