मुंबईत पावसाळ्या तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पंपिंग स्टेशन बनवण्यात आल्यानंतरही अनेक भागांमध्ये तुंबई होतेच. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातही पावसाळ्यातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या असल्याने महापालिकेने कोविड काळात याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन बनवून कलानगरला तुंबईमुक्त बनवले. परंतु ज्या मिनी पंपिंग स्टेशनची निर्मिती अवघ्या १२ कोटींमध्ये करण्यात आली असली तरी भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या पंपांसाठी पुढील तीन वर्षांकरता साडे सोळा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.त्यामुळे कलानगरची तुंबई रोखण्यावर वर्षाला साडे पाच कोटींची रखवाली द्यावी लागत असल्याची आकडेवारीच समोर आली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान )
प्रकल्पापेक्षा त्यांच्या देखभालीवरच अधिक खर्च
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास वांद्रे पूर्व कलानगरचा परिसर जलमय होऊन जातो. कलानगरसह सांताक्रुझ आणि बीकेसीचाही भाग पाण्याखाली जात असल्याने येथील मिठी नदीच्या मुखावर लोखंडी गेट्स बसवण्यात आले आहे. यामुळे मिठी नदी व वाकोला नदीच्या पाण्याचा प्रवाह हा कलानगर भागात पावसाळी नाल्यामध्ये येण्यास प्रतिबंध केला जातो. हे गेट्स बांधताना याठिकाणी एक हजार घनमीटर प्रति तास क्षमतेचे १८ नगर उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन भाडेतत्वावर घेत याठिकाणी बसवण्यात आले होते. त्यामुळे सन २०२० व २०२१ च्या पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचले गेले नाही. १८ पंपांच्या आधारे बनवण्यात आलेल्या या मिनी पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च झाला होता.
परंतु आता पुढील तीन वर्षांकरता सहा ठिकाणी बसवण्यात येणारे पंप भाडेतत्वावर घेण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तीन वर्षांकरता १६ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे वर्षाला साडेपाच कोटी रुपये खर्च या भाडेतत्वावरील पंपांकरता केला जाणार आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी १२ कोटींचा खर्च आणि तीन वर्षांकरता भाडेतत्वावर पंप घेण्यासाठी साडेसोळा कोटी रुपये खर्च येत असल्याने प्रकल्पापेक्षा त्यांच्या देखभालीवरच अधिक खर्च होताना दिसत आहे.
देखभाल करण्यासह पाणी उपसण्यासाठी भाडेतत्वावर पंप
महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या कंपनीची सेवा प्रांरभी वर्षात घेण्यात आली असती आणि त्यांना पुढील दहा वर्षांकरता हे काम दिले असते तर एवढा खर्च आला असता. परंतु सध्या भाडेतत्वावरील पंपावर केला जाणार खर्च निश्चितच जास्त आहे. हा खर्च तीन वर्षांकरता ९ कोटी रुपयांवर असायला हवा होता, असे काही अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.
ग्रीन शेड नाल्यावरील गेटच्याठिकाणी ५ पंप तर शीव धारावी पूलाजवळील जंक्शन, बीकेसी मेट्रो स्टेशन दोन याठिकाणी प्रत्येकी ४ आणि एमएमआरडीए गार्डनच्याठिकाणी प्रत्येकी दोन पंप हे एक हजार घनमीटर क्षमतेचे पंप बसवण्यात आले आहेत. तर हरिमंदिर रोड येथे ४८० घनमीटर क्षमतेचे दोन पंप बसवण्यात आले आहे. पावसाळ्यात हे सर्व पंप चार महिन्यांकरता भाडेतत्वावर घेण्यात येतात. या पातमुखांवर बसवलेल्या गेट्सचे प्रचाल व देखभाल करण्यासह पाणी उपसण्यासाठी भाडेतत्वावर हे पंप घेण्यासाठी या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी महाबल इन्फ्रा इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे.
Join Our WhatsApp Community