लीना मणिमेकलाई या कॅनडास्थित चित्रपटनिर्मात्या यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमधून भारतीय देवतेचा अवमान करण्यात आल्याचा आरोप होत आहे. कॅनडातील हिंदू समुदायानेही या पोस्टरवर आक्षेप घेत, पोस्टरवर बंदी आणावी, अशी मागणी कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाने येथील सरकारकडे केली. लीना यांना अटक करा, अशी मागणीही भारत व जगभरातील भारतीय समुदायांनी केली आहे.
लीना मणिमेकलाई यांनी शनिवारी सोशल मीडियावरुन काली या माहितीपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले. या पोस्टरमध्ये काली देवीला सिगारेट ओढताना आणि तिच्या एका हातात समलैंगिकतेचा प्रतिक असलेला झेंडा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांनी हे पोस्टर शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. लीना यांनी हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याने त्यांना अटक करावी, अशी मागणी होत असून, ‘अरेस्ट लीना मणिमेकलाई’ असा हॅशटॅगही चालवला जात आहे.
( हेही वाचा: बाईक- कार चालवणा-यांसाठी आनंदाची बातमी; नितीन गडकरींनी केली ‘ही’ घोषणा)
दिल्ली पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद
वादग्रस्त पोस्टरप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात गुन्हाची नोंद केली आहे. काली देवीचा अवमान झाल्याची तक्रार एका वकिलांनी केल्यानंतर या गुन्ह्याची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. लीना मणिमेकलाई या मूळ तमिळनाडूमधील मदुराईच्या रहिवासी आहेत.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
- धर्माची थट्टा करणा-यांना अटक करा.
- हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, हा संस्कृतीवर हल्ला आहे.
- हिंदूंच्या भावना दुखावणे हा चित्रपटाच्या प्रमोशनचा नवा मार्ग झाला आहे.
- हिंदू मारत नाहीत म्हणून लीना मरायला तयार आहे, जे खरेच मारतात त्यांची थट्टा ती करणार नाही.