कल्याणमधील इमारतीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी साडेआठ तासांचा थरार

180
कल्याण पूर्वेकडील चिंचवाडा येथील विठ्ठलवाडीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. नेहा अपार्टमेंट या जुन्या बांधकाम असलेल्या इमारतीतून बिबट्याला शोधून काढण्यासाठी वनाधिकाऱ्यांना तब्ब्ल आठ तासांची शोध मोहीम राबवावी लागली. बिबटयाने रस्त्यावर दोन माणसांवर तर इमारतीत वन्यप्राणी बचाव पथकाच्या सदस्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वनरक्षक थोडक्यात बचावले.

कल्याणमध्ये पहिल्यांदाच घडले बिबट्याचे दर्शन

गेल्या काही वर्षांत शहापूर, उल्हासनगर, बदलापूर येथे बिबट्याचा वावर वाढत असताना आता नागरी वसाहतीत येण्याचा प्रकारही वाढला आहे. गुरुवारी चिंचवाडा येथून चार किलोमीटर अंतरावर जंगलक्षेत्र आहे. या जंगलातूनच कल्याण चिंचवाडा येथे बिबट्या आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. या भागात रात्रीच बिबटया आला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे. कल्याणवासीयांची सकाळच बिबटयाच्या दर्शनाने झाली.

माध्यम प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधिंनी वनविभागाला कळवले

सकाळी सात वाजताच बिबट्या कल्याण परिसरात दिसल्याची चर्चा पसरली.माध्यम प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्यामार्फत वनविभागाला बिबटयाबाबत माहिती देण्यात आली. आठ वाजता कल्याण वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. काही तासांनी वन्यप्राणी बचाव पथकाची टीमही घटनास्थळी दाखल झाली.

बिबटया एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत शिरला 

संपूर्ण वनाधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबटया एका इमारतीतून नेहा अपार्टमेंटमध्ये शिरला. रस्त्यावर लोकांची गर्दी जमू लागल्याने दोन जणांवर बिबटयाचा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. नेहा अपार्टमेंटमधील दोन्ही विभागातील लोकांनी प्रसंगावधानता दाखवून कडी लावल्याने त्यांचा जीव वाचला.

विद्युत प्रवाह रोखला आणि वनाधिकारी इमारतीत घुसले

जुनी इमारत, चिंचोळ्या जागेमुळे बिबट्याला पकडण्याच्या शोधमोहिमेत इमारतीबाहेर हजारोंच्या संख्येने जमा झालेली गर्दी, इमारतीवर इतस्तत: पसरलेल्या विजेच्या वायर पाहता विद्युतप्रवाह बंद करण्यात आला. वनाधिकाऱ्यांनी इमारतीत घुसून ए विभागात बिबटयाचा शोध घेतला. ए विभागात बिबटया दिसून न आल्याने बी विभागात बिबटयाला शोधायला टीम विभागली गेली. ए विभाग आणि बी विभागाला जोडणाऱ्या गच्चीतून एक टीम बी विभागातील वरच्या माळ्यावर पोहोचली. बिबटया गच्चीवर पोहोचून पळण्याच्या प्रयत्नात असल्यास त्याला पकडण्यासाठी जाळी लावण्यात आली.

वन्यप्राणी बचाव पथकाचा सदस्य थोडक्यात बचावला

तिसऱ्या माळ्यावर वनाधिकारी पोहोचले असताना दिनेश गुप्ता या वन्यप्राणी बचाव पथकातील सदस्यावर बिबटयाने हल्ला केला. या हल्ल्यात गुप्ता यांना डोळ्यावर तसेच शरीरावर जखमा झाल्या. बिबट्या चौथ्या माळ्यावरील गच्चीवर पोहोचल्यावर तो जाळीत अडकला. बिबट्याचा पाठलाग करणाऱ्या टीमने त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन बंदूकीतून दिले. सायंकाळी साडेपाच वाजता बिबटयाला वनाधिकाऱ्यांनी जेरबंद करून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.