सुरु होण्यापूर्वीच ‘बायोमेट्रीक’ हजेरीला कामगार संघटनांचा विरोध

104

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून पुन्हा बायोमेट्रीक हजेरी लागू करण्याचा निर्णय प्रशासन घेतला असून त्यादृष्टीकोनातून प्रत्येक विभाग आणि खात्यांच्या आस्थापना विभागांना निर्देश देण्यात आले. त्यामुळे येत्या नवीन वर्षापासून बायोमेट्रीक हजेरी सुरु झाल्यास फसवाफसवीचा डाव खेळता येत नसल्याने काही कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचलता निर्माण झालेली आहे. त्यातच आता कामगार संघटनांनी या हजेरीपध्दतीला उघडपणे विरोध करत जुन्याच हजेरी पध्दतीचा वापर करण्याची मागणी केली आहे.

‘बायोमेट्रीक’ हजेरीमुळे संसर्गाचा धोका तीव्र

सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्यामुळे पुन्हा १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रीक हजेरी प्रणाली सुरू करण्यास आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. परंतु सद्या कोरोना व ओमिक्रॉनची संख्या दोन तीन दिवसात झपाट्याने वाढत असल्यामुळे तसेच रुग्णांची संख्या अडीज हजारापेक्षा जास्त झाल्यामुळे तसेच तज्ञ मंडळींनी तीसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असल्यामुळे सर्व महापालिका कामगार कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. महानगरपालिका कामगार-कर्मचारी अधिकारी अभियंते-परिचारीका-परिसेवीका-तंत्रज्ञ-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-अग्नीशमनदल कर्मचारी यांना बायोमेट्रीक मशिनवर फिजीकली अंगठ्याद्वारे हजेरी लावावी लागत असल्यामुळे संसर्गाचा धोका तीव्र आहे. ही बाब विचारात घेता म्युनिसिपल मजदूर युनयन चे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी महापौर किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह सभागृहनेत्या व महापालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना पत्र देऊन याला बायोमेट्रीक हजेरी लागू न करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – खान्देशातील सारंगखेड्याचा ‘घोडे बाजार’: ५ कोटींचा ‘रावण’ ठरला लक्षवेधी)

मस्टरवर हजेरी लावण्याची पध्दत सुरू ठेवण्याची मागणी

मुंबई शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे कामगार कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास कोणीही कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी बायोमेट्रीक प्रणालीमध्ये हजेरी नोंदवू नये तसेच आतापर्यंत सुरू असलेली मस्टरवर हजेरी लावण्याची पध्दत सुरू ठेवावी, असे आवाहन म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर व सहायक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी केले

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या योग्य तो निर्णय होणार

गुरुवारी ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी कस्तुरबा रुग्णालय येथे महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती दिलेली आहे. याबाबत महापालिका आयुक्त यांना बायोमेट्रीक हजेरी प्रणाली सुरू होऊ नये म्हणून निर्देश देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. यावर महापौर महोदयांनी संबंधितांशी चर्चा करून शुक्रवार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कामगार कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे युनियचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.