कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने देशभरात धडकीचं वातावरण निर्माण केलं आहे. या व्हेरियंटची भिती आतापर्यंत केवळ सामान्य माणसांपर्यंतच होती. मात्र कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रूग्णांवर उपचार करणारा डॉक्टरच या नव्या व्हेरियंटला घाबरला असल्याचे समोर आले आहे. कानपूरमधील सुशील कुमार मंधना या मेंदूच्या डॉक्टरला ओमिक्रॉनच्या दहशतीमुळे नैराश्य आले. हे नैराश्य अशा पातळीवर पोहोचले की, त्याने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचाच जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरने त्याची पत्नी, आणि दोन मुलांची हत्या केली आणि तो पसार झाला. ही हत्या करण्यापूर्वी त्याच्या मनात जे काही सुरू होते ते त्याने एका डायरीमध्ये नोंदवले. यानंतर या डॉक्टरने त्याच्या भावाला मेसेज पाठवला आणि या केलेल्या खुनाची माहिती दिली.
असा घडला प्रकार
कानपूर मधील सुशील कुमार मंधना यांना स्वत:ला कोरोनाची भिती असल्याचे सांगितले. या भितीपोटीच त्यांनी डायरीत लिहिले की,“आता कोरोना नाही. हा कोरोना सगळ्यांना मारून टाकेल.” मंधना हे वैद्यकीय महाविद्यालयात फोरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाट असताना त्यांनी कोरोना रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना खूप जवळून तडफडत मरताना पाहिले होते. यानंतर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यापासून ते नैराश्यात होते.
(हेही वाचा – ओमिक्रॉनची धडकी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू)
मनात चालेलं डायरीत लिहीले…
डॉक्टरने डायरी लिहिल्यानंतर सगळ्यांसाठी चहा तयार केला. यामध्ये त्यांनी गुंगीची पावडर मिसळली. चहा प्यायल्यानंतर डॉक्टरची पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी (१४) बेशुद्ध पडले, नंतर डॉक्टरने तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि पत्नीला मारून टाकले. शिखर व खुशीचा गळा दाबला व फरार झाला.
शवविच्छेदन अहवालातून होणार स्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या त्याने केल्यानंतर त्या ठिकाणी रक्ताने माखलेला हातोडा आढळला. असे सांगितले जात आहे की, एक व्यक्ती तीन जणांची हत्या करू शकत नाही. हत्येच्या आधी तिघांनाही बेशुद्ध केले असावे. मात्र अद्याप शवविच्छेदन अहवाल आला नसून तो आल्यानंतर खरा प्रकार काय याचा सर्व खुलासा होईल, असे सांगितले जात आहे.