Kargil Vijay Diwas : भारतीय सेनेने पाकड्यांना शिकवलेला धडा

106

संपूर्ण भारतासाठी आणि भारतीय सैन्य दलासाठी अभिमानाचा आणि शौर्याचा दिवस म्हणजेच कारगिल विजय दिवस. 26 जुलै हा दिवस दरवर्षी भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याने, घुसखोर पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करुन कारगिल युद्धात विजयी पताका फडकावली. भारतीय सेनेच्या या असामान्य शौर्याला 26 जुलै 2022 रोजी 23 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेशी थेट दोन हात करण्याची हिंमत नसलेल्या पाकिस्तानने 1999 मध्ये भ्याडपणे घुसखोरी केली, तेव्हा त्यांचा हा डाव निधड्या छातीच्या भारतीय जवानांनी उधळून लावला आणि शत्रूला सडेतोड उत्तर देत एक आक्रमक संदेशही दिला. यानंतर 23 वर्षे पाकिस्तानने पुन्हा कधी भारताच्या विरोधात असे कट कारस्थान रचले नाही.

पाकड्यांची घुसखोरी

लेह ते श्रीनगर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कारगिल हे शहर वसलेले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ असलेल्या या शहराच्या पट्ट्यात पाकिस्तानकडून मे 1999 मध्ये घुसखोरी करण्यात आली. भारतीय लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. कारगिलच्या आग्नेयेकडील द्रास आणि नैऋत्येकडील मश्को खोरे आणि बटालिक विभागांतील चौक्यांवरही घुसखोरी करण्यात आली.

(हेही शरद पवारांची कोलांटउडी! आधी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक नंतर टीका)

आणि युद्धाची ठिणगी पडली

कारगिल, द्रास आणि मश्को खो-यातील दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या चौक्या या समुद्रसपाटीपासून जवळपास 5 हजार मीटरपेक्षाही उंचावर आहेत. त्यामुळे काश्मीरच्या रक्त गोठवणा-या थंडीत इतक्या उंचावर कडक हिवाळ्यात सैन्य तैनात ठेवणे जिकिरीचे असते. हिवाळ्यात दोन्ही बाजूच्या सैन्याने माघार घेऊन उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर सैन्याने चौकीवर परतावे, असा एक अलिखित समंजस्य करार भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाच्या अगोदर होता. पण भारतीय सैन्य चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी चौक्यांचा ताबा घेतला. कारगिल युद्धाचा वणवा भडकण्याची हीच पहिली ठिणगी.

असे सुरू झाले युद्ध

2 मे 1999 ला कारगिलच्या बटालिक शहराजवळील घरकोन या छोट्याशा गावातील काही स्थानिकांनी सहा जणांना दगड फोडताना आणि बर्फ साफ करताना पाहिले. ते पाहून स्थानिकांना संशय आला. कारण ते सहा जण पठाणी आणि सैन्याच्या पोशाखात होते. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही होता. याची माहिती स्थानिकांनी ताबडतोब भारतीय सैन्याला दिली. त्यानंतर भारतील सैन्याची तुकडी पहाणी करण्यासाठी आली, तेव्हा त्यांना घुसखोरी झाली असल्याचे समजले. त्यानंतर सैन्याच्या वायू आणि स्थल सेनेने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्यासाठी युद्ध छेडले.

हुतात्म्यांची आहुती

मे 1999 मध्ये सुरू झालेले हे युद्ध तब्बल दोन महिने चालले. कारगिल युद्धात भारताने विजयश्री पटकावली. पण युद्धाच्या या होमकुंडात अनेक वीर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या युद्धात भारतीय सैन्याचे 527 जवान हुतात्मा झाले. अखेर पाकिस्तानने भारतासमोर नाक घासले आणि 26 जुलै 1999 रोजी या युद्धाला पूर्णविराम लागला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.