सतीश जारकिहोली बरळले…

157

कर्नाटकाचे काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश जारकिहोली यांनी काहीही कारण नसताना आपल्या अकलेचे तारे तोडले. हिंदू हा शब्द पर्शियन आहे असा जावई शोध त्यांनी लावला.जगातली सर्वात पहिली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आहे. अन्य संस्कृतींचा उदय त्यानंतर सहस्रावधी वर्षानंतर झाला.

संस्कृत भाषा ही जगातील सर्वात पहिली भाषा आहे. संस्कृत वाङ्मयात आपल्याला अनेक ठिकाणी हिंदू शब्द आढळतो. ही गोष्ट सतीश जारकिहोली यांना ठाऊक नाही. अज्ञानाच्या बळावर त्यांनी हिंदू हा पर्शियन शब्द आहे असे बेधडक विधान केले.‌

मेरूतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथात एक श्लोक आहे त्याच श्लोकात हिंदू या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. त्यावरून हिंदू कोणाला म्हणतात तेही स्पष्ट होते. तो श्लोक असा..
हिन्दुधर्म प्रलोप्तारो,
जायन्ते चक्रवर्तिन:।
हीनं च दूषयत्येव,
हिन्दुरित्युच्यते प्रिये।।

भावार्थ – हिंदू धर्माचा नाश करण्याची प्रतिज्ञा करून ती पूर्ण करण्यासाठी निरलसपणे उत्कट प्रयत्न करणारे मोठे चक्रवर्ती राजे पुढे येणार आहेत. हीन वृत्तीच्या लोकांना दूषण देणाऱ्यांना हिंदू म्हणतात.
अशी हिंदू शब्दाची व्याख्या याच श्लोकात करण्यात आली आहे.
सिंधू शब्दावरून हिंदू शब्द आला असे सांगितले जाते ते सुद्धा सत्य नाही. त्याचबरोबर आपल्या देशाला हिंदुस्थान हे नाव कसे पडले ते बार्हस्पत्य संहितेतला श्लोक आपल्याला सांगतो…

हिमालयं समारभ्य,
यावद्इन्दु सरोवरम् ।
तं देवनिर्मितं देशं,
हिंदुस्थान प्रचक्षते ।।
हिमालयापासून इन्दू सरोवरापर्यंतच्या देवनिर्मित दिव्य प्रदेशाला हिंदुस्थान असे म्हणतात. याचा अर्थ हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत म्हणजे दक्षिण समुद्रापर्यंत पसरलेला जो भूभाग आहे त्या भूभागाचे नाव हिंदुस्थान आहे.

हिमालय या शब्दातील पहिले अक्षर हि आणि इन्दू या शब्दातील दुसरे अक्षर न्दू ही दोन अक्षरे एकत्र केली की हिन्दू शब्द तयार होतो.

आता तुम्ही मला सांगा की कर्नाटकचे आमदार सतीश जारकिहोली सांगतात त्याप्रमाणे हिन्दू शब्द पर्शियन भाषेतून आला आहे का? त्याचबरोबर या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला तर आपल्याला लाज वाटेल असे तथ्यहीन विधान आमदार साहेबांनी केले आहे. माधव दिग्विजय, पारिजात हरण, शब्दकल्पद्रुमकोश, अद्भुतकोश इत्यादी अनेक ग्रंथांमध्ये हिंदू शब्दाच्या विविध व्याख्या आढळतात.

शब्दकल्पद्रुमकोश या ग्रंथात दिलेली हिंदूंची व्याख्या हिंदू किती उच्च प्रतीचे आहेत त्याचे वर्णन करणारी आहे. ती व्याख्या अशी…
हीनं दूषयत इति हिन्दु:।

जे जे म्हणून कमी प्रतीचे, हीन, निंद्य आणि दुषणास्पद असते त्याला जो त्याज्य मानतो तो हिन्दू.
हिंदु आणि हिंदू हे दोन्ही शब्द पुल्लिंगी असून त्यांचा अर्थ दुष्टनाशक असा आहे तसेच राक्षसांचे शत्रू असाही त्यांचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे जे रूपशालिनी आहेत ते हिंदू. असे हिंदूंचे वर्णन अद्भुतकोशात करण्यात आले आहे. चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने हिंदू आणि हिंदू संस्कृती विषयी काढलेले कौतुकास्पद उद्गार पुढील प्रमाणे आहेत…
‘हिंदू आणि त्यांची संस्कृती ही मानवाच्या निराश आणि निरुत्साही आत्म्याला शितल चंद्रिकेप्रमाणे सदैव आनंद आणि उत्साह यांचा झराच होऊन राहिली आहे.’

कर्नाटकच्या या आमदारांनी असे ग्रंथ वाचून आपली बुद्धी शुद्ध, पवित्र ठेवली असती तर हिंदू धर्माला लाखोल्या वाहणारे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी उत्तम आणि सकस ग्रंथांचे वाचन करावे म्हणजे बुद्धी भ्रष्ट होणार नाही. असा त्यांना अनाहूत सल्लाही आम्ही देत आहोत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.