कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबण्याचे अद्याप नाव घेत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीनंतरही मुस्लिम मुली हिजाब घालण्याच्या आपल्या आग्रहावर ठाम आहेत. दरम्यान, कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी सांगितले की, राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे हिजाब हवाच अशा हट्टाला पेटलेल्या हेकेखोर विद्यार्थ्यीनी आता काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्नाटकात परीक्षा आजपासून सुरू होणार असून 11 एप्रिल रोजी संपणार आहे. नागेश यांनी पत्रकारांना सांगितले की, “उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही हिजाब घालण्यास परवानगी दिली नाही. आम्ही स्पष्ट केले आहे की, हिजाब परिधान केलेल्या मुली हिजाब घालून कॅम्पसमध्ये येऊ शकतात परंतु त्यांना वर्गात हिजाब काढावा लागेल आणि परीक्षेत हिजाब घालण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
फेरपरीक्षा घेणार नाही
नागेश पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हिजाब किंवा स्कार्फ घालण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थींनी हिजाब घालून कॅम्पसमध्ये येऊ शकतात, परंतु त्यांना वर्गात जाण्यापूर्वी ते काढून टाकावे लागेल. ही अट संपूर्ण परीक्षेदरम्यान लागू असणार आहे. तसेच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थिनींची पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेकेखोर विद्यार्थिनींसमोर ‘हे’ दोनच मार्ग
अशा परिस्थितीत हिजाब घालण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलींसमोर दोनच मार्ग उरतात. एकतर ते हिजाब न घालता परीक्षा देऊ शकतात किंवा परीक्षा न देता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतील. मात्र, हा निर्णय कधी येणार आणि काय येणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.