‘स्पेशल २६’ : दोन तोतया FDA अधिकाऱ्यांना बेड्या

133

अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाचे अधिकारी म्हणून रेस्टॉरंट, डिपार्टमेंट स्टोर्स या ठिकाणी छापेमारी करून पैशांची मागणी करणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना दोघांजवळ एक डायरी सापडली असून या डायरीत हॉटेल, रेस्टॉरंट आणि डिपार्टमेंट स्टोर्सच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत.

काय आहे प्रकरण

धर्मेश शिंदे (२५) आणि वर्धन साळुंखे उर्फ अविनाश गायकवाड (२८) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. कांदिवली पूर्व आणि चारकोप या ठिकाणी राहणारे हे दोघे मित्र आहे. एकाचे शिक्षण दहावी तर दुसऱ्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ‘स्पेशल २६’ हा चित्रपट बघून या दोघांनी एफडीए अधिकारी बनून शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल आणि डिपार्टमेंट स्टोर्समध्ये जाऊन एफडीए अधिकारी असल्याचे सांगून छापा टाकण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करायचे.

या दोघांनी एफडीए विभागाचे हुबेहूब ओळखपत्रे तयार केले होते, तसेच एक मोटार व त्या मोटारीच्या डॅशबोर्डवर महाराष्ट्र शासन असलेली पाटी लावून हे दोघे छापे मारण्याच्या निमित्ताने हॉटेल, रेस्टॉरंट आणि डिपार्टमेंट स्टोर्समध्ये जाऊन तपासणी करण्याच्या नावाखाली मालकाकडून पैसे उकळत होते. गेल्या आठवड्यात हे दोघे बोरिवली पूर्वेतील एका हॉटेलमध्ये गेले व त्यांनी एफडीए अधिकारी असल्याचे सांगत आपले ओळखपत्र दाखवले, मात्र बनवलेल्या ओळखपत्रावर सेवानिवृत्त एफडीए अधिकारी यांचे नाव होते. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना हॉटेलचा मॅनेजर ओळखत असल्यामुळे हॉटेल मालक आणि मॅनेजर यांना संशय आला व त्यांनी या दोघांना बोलण्यात गुंतवून पोलिसांना कळविले. परंतु काही तरी गडबड असल्याचा संशय येताच या दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हॉटेल कर्मचारी यांनी एकाला पकडले.

(हेही वाचा – हुकुमशाह किम जोंग उनचं नवं फर्मान! ‘मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा’)

यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वर्धन साळुंखे उर्फ अविनाथ गायकवाड याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान अविनाथ गायकवाडच्या दुसऱ्या सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्याला देखील अटक करण्यात आली. पोलिसांनी या दोघांजवळून बनावट ओळखपत्र, गुन्हयात वापरलेली मोटार, एक डायरी असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या डायरीत अनेक नोंदी पोलिसांना आढळून आलेल्या असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.