बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. या वादग्रस्त विधानांमुळे कंगनाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी आतंकवाद्यांसोबत केल्याने कंगना चांगलीच चर्चेत आली होती. कंगनाने केलेल्या या प्रतिक्रियेनंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने कंगनाविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात आज मंगळवारी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कंगनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. अखेर कंगनाविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीला २ वर्षे पूर्ण, पाटलांनी आता झोपेतून जागे व्हावे!)
शीख समुदायाच्या विरोधात सोशल मीडिया पोस्टमध्ये अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप कंगनावर होता. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने कंगनाविरोधात कलम २९५ (अ), भारतीय दंड संहिता आणि इतर कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने सोशल मीडियाद्वारे शीख धर्मियांविरूद्ध अपमानास्पद विधान केले होते. यानंतर हा वाद आणखी वाढला. दिल्लीतील शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाने कंगनाच्या सोशल मीडियावर शीखांसाठी वापरण्यात आलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. कंगनाने किसान आंदोलनाचे वर्णन खलिस्तानी आंदोलन असे केले होते.
काय म्हणाली होती कंगना
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. कंगनाने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये शीख धर्मियांना खलिस्तानी दहशतवादी असे म्हटले होते. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन ही एक खलिस्तानी चळवळच आहे, असेही तिने संबोधले आहे. इतकेच नाही तर १९८४ च्या शीख हत्याकांडाची आठवण देत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारदाराकडून सांगण्यात आले होते. केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. त्यावेळीस कंगनाने जाणून बुजून शेतकऱ्यांचा निषेध केला आणि तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले होते. त्यामुळे कंगनाच्या वक्तव्यामुळे शीख समाजात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.