आपल्या मुलाचे कायमचे आजारपण निघून जावे, त्याला चांगले आरोग्य स्वास्थ्य लाभावे, त्याचे आयुष्य वाढावे, मग त्यासाठी दुसऱ्याच्या मुलाचा नरबळी द्यावा, म्हणून अमळनेर येथे राहणाऱ्या चौहान कुटुंबियाने त्यांच्याच गावात राहणारा राठोड कुटुंबियाचा ९ वर्षांचा मुलगा सुदर्शन यांचा नरबळी दिला. वारंवार मागणी करूनही पोलीस राठोड कुटुंबियांची तक्रार दाखल करून घेत नाही, म्हणून ते कोर्टात गेले. कोर्टाने दट्ट्या देताच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू असूनही आजदेखील अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नरबळीसारख्या घटना घडत आहेत, हे दुर्दैव!
आकस्मित निधनाची नोंद!
७ एप्रिल २०२० रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात ९ वर्षांच्या सुदर्शन राठोड नावाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहाच्या गळ्यात लिंबू, मिर्चीचा हार घातलेला आणि कपाळाला टिळा लावलेल्या अवस्थेत होता. चौहान कुटुंबियांचा जेव्हा कार्यक्रम होता, तेव्हाच ही घटना घडल्याचे समोर आले. त्यामुळे राठोड कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र राजकीय दबावामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. तसेच आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली.
(हेही वाचा : नोकरीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; समाजकल्याण अधिकाऱ्याची चौकशी )
न्यायालयाकडून खुनाचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश!
त्यामुळे अखेर राठोड कुटुंबियांनी अमळनेर येथील न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात राठोड कुटुंबियांनी जेव्हा त्यांचे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा न्यायालयाने तात्काळ पोलिसांना १ वर्षापूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी १६ जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत चौकशी करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात पोलिसांनी केवळ आकस्मिक निधन म्हणून प्रकरण नोंदवून घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.