मुंबई महापालिकेच्या विविध विभाग आणि खात्यातील गायक कामगार, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकाच गीतकाराची शंभराहून अधिक गाणी एकाच व्यासपीठावर स्वतंत्र सादर करत एक विक्रम रचला आहे. या विश्वविक्रमाची दखल ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ ने घेतली असून त्यांच्या पुस्तकामध्ये नोंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गायनाच्या माध्यमातून विश्वविक्रम करणाऱ्या या महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची विनंती महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेचे कर्मचारी गायकीतही सरस, रचला विश्वविक्रम)
महापालिकेचे कर्मचारी गायकीतही सरस
मागील शनिवारी दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी गीतकार साहिर लुधियानवी ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महानगरपालिकेमधील संगीतप्रेमी ११९ अधिकारी व कर्मचारी यांनी शीवरुग्णालयातील सभागृहात त्यांच्या गाण्याचा एक अनोखा कार्यक्रम सादर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी ‘सो गो’ हा गायनाचा ग्रुप स्थापन केला आहे.या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आठ तासांमध्ये गीतकार साहिर लुधियानवी हयांची १०० एकल गीते सादर करून एक विश्वविक्रम नोंदविला आहे. सदर कार्यक्रमामध्ये एकूण ११९ कर्मचाऱ्यांनी गाणी सादर केली असून हा कार्यक्रम शैलेंद्र सोनटक्के, उत्तम गोवेकर आणि प्रीती पुजारा यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सदर कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध खात्यांमधील वरिष्ठ ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
विश्वविक्रमाची ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद
विश्वविक्रमाची ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’ ने नोंद घेतली असून त्यांच्या पुस्तकामध्ये सदर विश्वविक्रमाची नोंद करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेकरिता ही बाब अतिशय अभिमानाची असून कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा मुंबई महानगरपालिकेमार्फत सत्कार होणे आवश्यक असल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी या विश्वविक्रमी कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या अधिकारी तथा कर्मचारी यांचा सन्मान करण्याबाबत सकारात्मक विचार करून, आवश्यक ते आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community