गुन्हेगारांसाठी गुंड या शब्दाचा शब्दप्रयोग केला जातो, मात्र तुम्हाला माहित आहे का? की गुंडा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? हा शब्द कसा आणि कुठून आला? काय आहे या शब्दामागची कथा? इंग्रजांच्या काळात एका व्यक्तिच्या नावावरुन हा शब्द प्रचलित झाला.
गुंडा हा शब्द हिंदी सिनेमांमध्ये आपण अनेकदा ऐकला आहे. गुंडा हा हिंदी चित्रपटही खूप गाजला. मुळात हा शब्द आला कुठून याचा कधी विचार केला आहे का ? काही जणांच्या मते हा शब्द पश्तू भाषेत आहे, तर काहींच्या मते पश्तूशी याचा संबंध नसून भारतात अनेक भाषांत हा शब्द वापरात आहे. तमिळमध्ये शक्तीशाली नायकाला गुंडा संबोधले जाते, तर मराठीत गावगुंडा असा शब्द प्रचलित आहे.
गुंडा हा शब्द बदमाश व्यक्ती याच अर्थाने भारतात वापरला जातो. असे म्हणतात की, 1910 मध्ये बस्तर येथील एका व्यक्तीच्या नावावरुन हा शब्द वापरात आला. बस्तरमधील गुंडा धुर नावाच्या व्यक्तीवरुन हा शब्द वापरायला सुरुवात झाली.
तत्कालीन ब्रिटिश राजवटीविरुद्ध गुंडा धुर याने बंड केले. इंग्रजांना पळवून लावण्याचा निर्धार करत त्याने त्यानुसार कारस्थाने सुरु केली. मात्र ब्रिटीशांच्या दृष्टीने गुंडा हा एक गुन्हेगार होता. काहीजणांच्या मते इंग्रजांच्या राजवटीतील पोलिसांनी गुन्हेगाराला समानार्थी म्हणून गुंडा इतकेच संबोधायला सुरुवात केली आणि हळूहळू या शब्दाचा प्रसार झाला. साधारण 1920 पासून वृत्तपत्रांतील गुन्हेगारी जगतातल्या बातम्यांमधून या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली.
( हेही वाचा: वेड्यावाकड्या ‘जिलेबी’च्या जन्माची कथा! )
अर्थात ही आख्यायिका आहे. प्रत्येक भाषेत एखाद्या शब्दाविषयी काही ना काही आख्यायिका असतेच. पण गुंडा या शब्दाविषयी सांगताना अनेक जण दाखलाही देतात, असा दाखला देणा-यांची संख्यांही मोठ्या प्रमाणात आहे.
Join Our WhatsApp Community