महाराष्ट्रात ज्या हनुमान चालिसावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ती हनुमान चालिसा कोणी लिहीली? कुठे लिहिली? हे माहित आहे का? हनुमान चालिसा रचण्यामागची कथा रंजक आहे. 16व्या शतकात संत गोस्वामी तुलसीदास यांच्यासोबत घडलेल्या घटनेने हनुमान चालिसाचा जन्म झाला. जाणून घेऊया, हनुमान चालिसा आणि ते रचणा-या गोस्वामी तुलसीदास यांची कहाणी.
संकटमोचक हनुमान यांची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोक, स्त्रोत्रे, रचना रचल्या गेल्या आहेत. ज्यात हनुमान बाहुक, हनुमानाष्टक आणि हनुमान चालीसा प्रमुख आहेत.
आणि अकबराने तुलसीदासांना तुरुंगात टाकले
तुलसीदास हे 16 व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि रामभक्त होते. त्यांच्या भक्तीच्या आणि प्रभू रामाचे दर्शन झाल्याच्या गोष्टी सर्वदूर पसरल्या होत्या. ही गोष्ट त्या काळातील मुघल शासक अकबर याच्या कानी गेली आणि त्याने खरेखोटेपणा जाणून घेण्याच्या उद्देशाने तुलसीदास यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले. तुलसीदास यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आला की एकतर त्यांनी श्रीरामाचे दर्शन अकबराला घडवावे किंवा त्याच्या स्तुतीपर काव्यग्रंथ रचावा. यावर प्रभू केवळ त्यांच्या भक्तांना दर्शन देतात असे गोस्वामिनी अकबराला सांगितले. यावर संतप्त होऊन अकबराने तुलसीदास यांना कारागृहात टाकले.
या तुरुंगातून आपली सूटका व्हावी, यासाठी तुलसीदास यांनी बजरंगबलीकडे प्रार्थना केली. तीच प्रार्थना पुढे हनुमान चालिसा म्हणून प्रसिद्ध झाली. तुरुंगात असताना, तुलसीदास यांनी अवधी भाषेत हनुमान चालिसा लिहिली. अखंड चाळीस दिवस त्याचे पठण केले. हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, अचानक असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रिला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला. माकडांची ही दहशत रोखण्यात अकबराचे सैन्यही अपयशी ठरले. काही केल्या या माकडांचा उपद्रव कमी होईना. तेव्हा मग अकबराने नाइलाजाने एका मंत्र्याच्या सल्ल्यानुसार, तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका केली. तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका होताच, माकडे संपूर्ण परिसर सोडून निघून गेली असे म्हणतात. अकबराला तुलसीदास यांचा महिमा समजला आणि त्यांनी तुलसीदास यांची क्षमा मागितली.
अशाप्रकारे तुलसीदासजींनी हनुमान चालिसेच्या रुपात माणसाला अडचणीच्या काळातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला.