क्रिकेट जगतात फार सन्मानाने घेतल्या जाणा-या नावांपैकी एक नाव म्हणजे वानखेडे. महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या पुढाकारामुळे बांधण्यात आलेले वानखेडे स्टेडिअम हे जगातील लोकप्रिय क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. याच स्टेडियमवर ‘बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया’ चे मुख्यालय आहे. या वानखेडे स्टेडिअमच्या जन्माची कहाणीही तितकीच रंजक आहे.
तो अपमान वानखेडेंच्या जिव्हारी लागला
1963 साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, त्यासोबतच त्यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली होती. राजकारणी लोकांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी म्हणून, त्या वर्षी ‘आमदार चषक’ या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. या संदर्भात नेमण्यात आलेली समिती प्रस्ताव घेऊन बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्याकडे गेली. वानखेडेंनी तो प्रस्ताव लगेच मान्य केला. हे क्रिकेट सामने ब्रेबाॅन स्टेडियमवर खेळवण्याचा विचार पुढे आला. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी विजय मर्चंट या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्षांकडे भेटीसाठी वेळ मागितली. भेटीनंतर, वानखेडे यांनी ब्रेबाॅन स्टेडियमवर सामने खेळवण्याची परवानगी नाकारली, शिवाय वानखेडे यांना तुमच्यासारख्या घाटी लोकांना क्रिकेटमधले काय कळते, असा प्रश्न विचारला आणि या भेटीत झालेला अपमान वानखेडे यांच्या जिव्हारी लागला.
( हेही वाचा: महाराष्ट्र दिन: मराठी माणसाने वाघाच्या जबड्यात हात घालून असा मिळवला महाराष्ट्र )
सोनेरी क्षणांचा साक्षीदार
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे एक तरी स्टेडिअम असावे, असे त्यांनी या भेटीनंतर ठरवले आणि मुंबईतच दुसरे क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा वानखेडे यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शशी प्रभू या आर्किटेक्टच्या साहाय्याने वानखेडे स्टेडियम हे केवळ 13 महिन्यांत बांधण्यात आले.
45 हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था असलेले वानखेडे स्टेडियम हे भारतातील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे.
2 एप्रिल 2011 या सोनेरी दिवसाचे वानखेडे स्टेडियम साक्षीदार आहे. या दिवशी भारताचा स्टार क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने षटकार मारुन भारताला 28 वर्षांनी विश्वचषक जिंकवून दिला होता.