कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगांमुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना कोकणाला करावा लागतो. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे असून 50 तालुके आणि 6 हजार 353 गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी 2 हजार ते 3 हजार 368 मि.मी. पाऊस हा कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोकण विभागात गेल्या सहा वर्षात सरासरी 2 हजार 701.40 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 371 पूरप्रवण व 223 दरडग्रस्त गावे आहेत. गेल्या वर्षी कोकणात तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले. या वादळाचा प्रभाव इतका होता की कोकणातील दैनंदीन जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यानंतर महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली.
( हेही वाचा : कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज)
शासकीय यंत्रणांची पूर्वतयारी
यंदाच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्वतयारी केली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जून पासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफ ची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येत आहेत. आपत्कालीन कालावधीत “शून्य जीवितहानी” हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशीत करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व बैठकीत केल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर पूर्वतयारी करण्यात येत आहे. तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. विभागस्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी समन्वय साधण्यात येत असून, मान्सूनपूर्व तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात यावी त्यादृष्टीने जिल्हास्तरापासून ग्रामपातळीपर्यंत आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी ही देखील महत्वाची आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती आराखडा तयार करणे तो अद्यावत करणे, विविध कार्यशाळा आयोजित करणे तसेच रंगीत तालीम आदी उपक्रम जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यक्रमात राबविण्यात येतात. गाव आपत्ती व्यवस्थापन समिती आदी सदस्यांचे प्रशिक्षण, कार्यलयीन कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांचे प्रशिक्षण तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी पथनाट्य, जाहिरात फलक, पोस्टर्स स्पर्धा, आदी कार्यक्रमाव्दारे जनजागृती करण्यात येते. निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याशिवाय पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आपतकालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदीचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरीरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी पावसाळा सुरु होण्याआधिच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणाऱ्या बैठका घेऊन आपली पुर्वतयारी केली आहे. या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनांनुसार गावोगावी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संभांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे.
नागरी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्यात आली असून, आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
नाले आणि गटारसफाईच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साथ रोगांचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधसाठा व जंतुनाशके फवारणीचे नियोजन, धोकादायक इमारती बाबत उपाययोजना, रस्ते व पूल दूरुस्ती, आपदग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय, आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचे अद्ययावतीकरण करण्यात आले अहे.
धरणांच्या पाणी साठा विसर्गाचे योग्य नियोजन
पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले आहेत. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून, त्याद्वारे धरण क्षेत्रातील परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून १५ जूनपासून लाईव्ह पाहू शकतो.
कोकण विभागात ठाणे जिल्हयातील भातसा, बारवी, तानसा व मोडकसागर अशीमोठी 4, पालघर जिल्हयाजील सूर्या-धामणी, वांद्री-पालघर, कुर्जे- डहाणू अशी मोठी 3, रायगड जिल्हयातीलहेटवणी, भीरा व डोलवहाल असे मोठे 2 लघु प्रकल्प 28, रत्नागिरी जिल्हयात मोठे 2 लघु प्रकल्प 46, सिंधुदूर्ग जिल्हयातील तिलारी हे मोठे 1 मध्यम प्रकल्प 1 लघु प्रकल्प 23 असे एकूण मोठे 10, मध्यम 3 आणि लघु प्रकल्प 97 आहेत. या धरणांच्या पाणी साठा विसर्गाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी कोकण विभागातील जिल्हयांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे लाईफ जॅकेट 1166, बोटी 77, लाईफ बोई 842 एवढी सुस्थितीत असलेली साधन सामग्री उपलब्ध आहे.
कोकण विभागात आपत्ती झाल्यास कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
विभागीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष
- कोंकण भवन, नवी मुंबई -022-27571516
- मुंबई शहर – 022-22664232
- मुंबई उपनगर – 022-26556799/ 26556806
- ठाणे -022-25301740/25381886
- पालघर -02525-297474
- रायगड -02141-222118
- रत्नागिरी – 02352-222233/226248
- सिंधुदुर्ग -02362-228847