कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज

151

कोकण विभागात मुसळधार पाऊस पडतो. कोकण रेल्वेने यंदाही सुरक्षाविषयक कामे पूर्ण केली असून पावसाळ्यात चोवीस तास गस्तीसाठी ८४६ जणांची नियुक्ती केली आहे. मान्सूनला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून १० जूनपासून गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोकण रेल्वेने ७४० किलोमीटर मार्गावर नियोजित सुरक्षा कामे पूर्ण केली आहेत. गटारांची साफसफाई, रुळांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. गाड्या सुरक्षितपणे चालवता याव्यात यासाठी कोकण रेल्वेमार्गावर मान्सून पेट्रोलिंग केले जाणार आहे.

कोकण रेल्वे सज्ज

मुसळधार पाऊस पडल्यास दृश्यमानता मर्यादित असताना लोको पायलटना ताशी 40 किमीच्या कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ-प्रोपेल्ड एआरएमव्ही (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) सज्ज ठेवण्यात आली आहेत.

( हेही वाचा : मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय!)

सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालयांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर 25 वॅटचे VHF बेस स्टेशन आहे. यामुळे वायरलेस संप्रेषण करण्यास मदत होते. 9 स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. ही पर्जन्यमापक यंत्रे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद ठेवत पावसाचा जोर वाढल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करतील. 3 ठिकाणी पुलांसाठी पूर सावधानता प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास ही यंत्रणा अधिकाऱ्यांना सतर्क करेल.

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष, गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी पावसाळ्यात २४ तास काम करतील. मान्सूनचे वेळापत्रक 10 जून 2022 पासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू होईल. प्रवासी पावसाळ्यात www.konkanrailway.com वर भेट देऊन किंवा Google Play Store वरून KRCL अॅप डाउनलोड करून किंवा 139 डायल करून आपल्या गाडीची स्थिती तपासू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.